'इर्विन'ची बत्ती गुल; मोबाईल टॉर्चवर रुग्णांवर उपचार; उकाड्यामुळे डॉक्टर, रुग्णांचे हाल
By उज्वल भालेकर | Published: May 8, 2023 04:41 PM2023-05-08T16:41:09+5:302023-05-08T16:41:40+5:30
Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील काही वार्डातील तसेच बाह्यरुग्ण विभागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने डॉक्टर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.
उज्वल भालेकर
अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील काही वार्डातील तसेच बाह्यरुग्ण विभागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने डॉक्टर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही रुग्णालयासाठी नित्याची बाब झाली आहे. वीज नसल्याने रुग्ण, डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही नाहकत्रास सहन करावा लागला.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपुऱ्या सोयीसुविधेमुळे रुग्ण तसेच नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशातच सोमवारी सकाळी ११ वाजतापासूनच रुग्णालयातील काही भागातील वीज पुरठा काही तांत्रिक बाबीमुळे बंद होता. त्यामुळे काही वार्डात उजेड तर काही वार्डांमध्ये काळाकुट्ट अंधार असल्याचे चित्र रुग्णालयात दिसून येत होते. महत्वाचे म्हणजे रुग्णालातील बाह्र रुग्ण विभागातही अंधार असल्याने अपघातग्रस्ता शिवाय इतर सर्वच रुग्णांवर मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली होती. तब्बल पाच तासांपेक्षा अधिककाळ वीजपुरवठा हा खंडित राहिल्याने रुग्णांसह डॉक्टरांनाही गर्मीमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
वारंवार वीज पुरवठा खंडित
जिल्हा सामान्य रुग्णालयात वीज पुरवठा खंडित होण्याची बाब ही नित्याची झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर याठीकाणी तासंतास वीज पुरवठा राहत नाही. अशात रुग्णालयातील आयसीयू तसेच लहान मुलांच्या वार्डामध्येच जनरेटरची सुविधा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
रुग्णालयातील काही भागांमध्येच वीज पुरवठा हा खंडित झाला आहे. रुग्णालयाच्या मेंटनसची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने त्यांना माहिती दिली असून सकाळपासूनच कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करत आहे.
डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय