वृक्षलागवडीचा कोकर्डा येथेही बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:12 AM2021-04-25T04:12:46+5:302021-04-25T04:12:46+5:30
अनिल कडू फोटो पी २४ कोकडा परतवाडा : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अंजनगाव सुर्जी अंतर्गत कोकर्डा येथील वृक्षलागवडीचा बट्ट्याबोळ झाल्याचे ...
अनिल कडू
फोटो पी २४ कोकडा
परतवाडा : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अंजनगाव सुर्जी अंतर्गत कोकर्डा येथील वृक्षलागवडीचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे.
नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत कोकर्डा रेल्वे जागेवरील पाच हेक्टर क्षेत्रावर ५ हजार ५५५ रोपे, तर कोकर्डा ई वर्ग परिसरातील १२ हेक्टर क्षेत्रावर १३ हजार ३३२ असे एकूण १८ हजार ८८७ रोपांची लागवड सामाजिक वनीकरण विभागाकडून केल्या गेली. दोन वर्षांपूर्वी लावल्या गेलेल्या या रोपांपैकी जिवंत रोपांची संख्या नसल्यातच जमा आहे.
१८ हजार ८८७ रोपांपैकी १८ टक्के रोपे जिवंत नाहीत.
या प्रकारावर कोकर्डा येथील निवृत्ती बारब्दे यांचेसह गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या असून, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोबतच स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची या क्षेत्रावर नव्याने लागवड करून जैवविविधतेसह पर्यावरण अधिक सशक्त करण्याची आवश्यकता असल्याचेही मत त्यांनी नोंदविले आहे.
याच अंजनगाव सामाजिक वनपरिक्षेत्र अंतर्गत सैदापूर, खीरगव्हाण व सोनगाव जुने रेल्वे जागेवरील सात हेक्टर क्षेत्रातील वृक्षलागवडीतील गडबडीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी १५ एप्रिलच्या पत्रान्वये संबंधित अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीची शिफारस आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान यात खातेनिहाय चौकशी कुणाची करणार, यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ज्यांनी ही वृक्ष लागवड केली ते वनक्षेत्रपाल नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत. घोटाळ्याकडे दुर्लक्ष करीत केवळ वनक्षेत्रपाल यांना सेवा पुस्तिका ताकिद देऊन मोकळे करणारे विभागीय वनाधिकारी सध्या वेगळ्या प्रकरणावरून निलंबित आहेत. त्यामुळे आज तरी आपला ४ जानेवारी २०२० चा स्थळ पंचनामा बदलवून वरिष्ठांच्या सांगण्यावरून फेरतपासणी करीत सर्व छान छान दाखविणारे सहायक वनसंरक्षक तेवढे डोळ्यासमोर दिसत आहेत.
आदेशाकडे नेहमीच दुर्लक्ष
सामाजिक वनीकरण विभागांतर्गत होणाऱ्या गडबड घोटाळा यांच्या अनुषंगाने निर्णयात्मक आदेशाकडे दुर्लक्ष करण्याची जणू काही परंपराच सुरू आहे.
बॉक्स
ते प्रकरण दडपविले!
मेळघाटातील गट ग्रामपंचायत सोनापूरमध्ये मनरेगाच्या कामात झालेल्या घोटाळाच्या अनुषंगाने संबंधित वनक्षेत्रपालासह दोन ग्राम रोजगार सेवकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी २१ ऑक्टोबर २०२० ला दिलेत. रोजगार हमी कायदा अंतर्गत संबंधितांवर त्यांनी दंडही ठोठावला. मृत व्यक्तीचे नाव हजेरी पत्रकावर घेऊन, त्याच्या नावे मस्टर काढून मजुरी उचलल्याचा आरोप संबंधितांवर तक्रारकर्त्याने केला होता. सीईओंच्या त्या आदेशानंतर आजपर्यंत या प्रकरणात कुणावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.