तळेगावात महिन्याभरात पाईप लाईनचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:28+5:302021-02-11T04:14:28+5:30
तळेगाव दशासर : गत वर्षभरापासून तळेगावात पाणीपुरवठा नळ योजनेच्या पाईप लाईनचे जाळे पसरविण्याचे काम सुरू आहे. काही प्रभागांत ही ...
तळेगाव दशासर : गत वर्षभरापासून तळेगावात पाणीपुरवठा नळ योजनेच्या पाईप लाईनचे जाळे पसरविण्याचे काम सुरू आहे. काही प्रभागांत ही कामे अत्यंत संथगतीने पूर्ण करण्यात आली. त्यातच तंत्रज्ञांची मदत न घेता, अनियमितपणा व हलगर्जीपणाने ही कामे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत ही पाईप लाईन फुटली. त्यामधून दररोज पाणी वाया जात आहे.
तळेगावातील प्रभाग क्र. ५ व ६ मधील पाईप लाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी अकारण वाया जात आहे. कंत्राटदाराच्या मनमर्जीने कोट्यवधीचे काम करण्यात आल्याने ही नळ योजना गावकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी डोकेदुखी ठरली आहे. त्यासाठी नव्याने झालेले सिमेंट, डांबराचे रस्ते फोडण्यात आली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन सर्वांना पाणी मिळेल, अशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.