नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना - राज्यपाल रमेश बैस

By गणेश वासनिक | Published: June 24, 2023 05:06 PM2023-06-24T17:06:05+5:302023-06-24T17:06:45+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत सोहळा थाटात

Be a job giver, not a job seeker - Governor Ramesh Bais | नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना - राज्यपाल रमेश बैस

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना - राज्यपाल रमेश बैस

googlenewsNext

अमरावती : केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण हे नीतीमूल्य आणि पिढी घडविणारे ठरणार आहे. येत्या काळात आधुनिक शिक्षण प्रणाली विकसित होणार आहे. त्यामुळे आता युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे, असा मोलाचा सल्ला राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी दिला.

संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर मुख्य अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू, हर्षवर्धन देशमुख, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. आर. डी. सिकची, डॉ. व्ही. एम. मेटकर, डॉ. एच. एम. धुर्वे, डॉ. व्ही. एच. नागरे, सहसंचालक उच्च शिक्षण डॉ. नलिनी टेंभेकर, सहसंचालक तंत्रशिक्षण डॉ. व्ही. आर. मानकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक मोनाली तोटे पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. डुडुल, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. डी. डब्ल्यू. निचित, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राज्यपाल बैस म्हणाले, अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव हे महत्त्वाचे ठरले आहे. गाडगेबाबा हे स्वच्छतेचे जनक असून त्यांची दशसूत्री समाजाला मार्गदर्शक ठरली. त्यामुळे आता गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर विद्यापीठाने किमान १० गावे दत्तक घेऊन समाजात परिवर्तन करावे. शेतकऱ्यांसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्याधन हे कुणीही हिरावू शकत नाही. त्यामुळे शिका, मोठे व्हा आणि समाजाचं ऋण फेडा, असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला. यापुढे कोणतेही महाविद्यालय ‘नॅक’ मूल्यांकन शिवाय राहता कामा नये, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन सर्वच महाविद्यालयांचे ‘नॅक’ करून घ्यावे, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले.

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकाचे सात गुणवंत ठरले मानकरी अभियांत्रिकीच्या विविध सहा शाखांतून प्रथम आणि सर्व शाखांमधून गुणवत्ता प्राप्त एक अशा सात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. यात आशुतोष राठोड (यवतमाळ), प्रियंका चव्हाण (शेगाव), लखन राठी (अमरावती), प्रतीक जाधव (यवतमाळ), शाहीद शफी तवर (बडनेरा), प्राची अपाले (बडनेरा), समीक्षा ढोक (वरूड) यांना राज्यपाल रमेश बैस, कुलगुरू डॉ. प्रमोद यावले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांच्या हस्ते पदकांनी गौरविण्यात आले.

Web Title: Be a job giver, not a job seeker - Governor Ramesh Bais

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.