सावधान! अपघाताचा बनाव करून लुटणारे सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:34 PM2019-07-03T23:34:46+5:302019-07-03T23:35:24+5:30
तुमच्या वाहनासमोर येऊन कोसळल्यासारखे करणे आणि मोबाइल फुटल्याचा बनाव करून मोबदल्याचा तगादा लावणे, अशा पद्धतीने गंडविणाऱ्या दोन टवाळखोरांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोतवाली पोलिसांनी मध्यतंरी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र, त्यानंतरही काही व्यक्तींबाबत असा प्रसंग घडल्याची माहिती पुढे आली आहे. अशा टोळीला न घाबरता पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तुमच्या वाहनासमोर येऊन कोसळल्यासारखे करणे आणि मोबाइल फुटल्याचा बनाव करून मोबदल्याचा तगादा लावणे, अशा पद्धतीने गंडविणाऱ्या दोन टवाळखोरांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोतवाली पोलिसांनी मध्यतंरी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र, त्यानंतरही काही व्यक्तींबाबत असा प्रसंग घडल्याची माहिती पुढे आली आहे. अशा टोळीला न घाबरता पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिनाभरापूर्वी कोतवाली हद्दीतील रेल्वे स्थानक चौकात एका व्यक्तीच्या दुचाकीसमोर दोन तरुण अचानक आले. कोसळल्यासारखे करून त्यांनी मोबाइल फुटल्याचा आव आणला. भरपाईच्या मागणीसाठी ते दुचाकीस्वाराच्या मागेच लागले. त्यांना मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात नेले. पाच हजारांचा खर्च सांगितला. मात्र, त्या दुचाकीस्वाराजवळ तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. मात्र, त्या भामट्यांनी दुचाकीस्वाराकडे तगादा लावून धमकाविणे सुरू केले. वाद वाढत असल्याचे पाहून दुचाकीस्वाराने या घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी पाचारण करून दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले.
यांच्यासोबत घडला प्रसंग
दहा-बारा दिवसांपूर्वी शहरातील रहिवासी धीरज बारबुध्दे यांना त्यांचे शेजारी राजाभाऊ भुयार यांनी घाबरलेल्या आवाजात फोन केला. जुना कॉटन मार्केटसमोर त्यांच्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले. विशिष्ट समुदायातील दोन तरुण अपघातामुळे मोबाइल फुटल्याचे सांगत मोबदला मागत आणि धमकावत असल्याचे त्यांनी सांगितले. धीरज बारबुद्धे यांनी त्यांना पोलीस तक्रारीचा सल्ला दिला. मात्र, भुयार यांचे धाडस झाले नाही. ते त्या दोघांना घेऊन बारबुद्धे यांच्या घरी पोहोचले. अपघातात फुटलेला मोबाइल फेकून दिल्याचे ते दोघे सांगत होते. भुयार यांनी तडजोड करून सहा हजार रुपये दिले. भानगड निपटल्याचे समाधान भुयार यांना झाले. मात्र, ते भामटे होते, याची कल्पनाही बारबुद्धे व भुयार यांना नव्हती.
दुसऱ्यांदा तसाच प्रसंग
पुसदा येथील एक कास्तकार वसंतराव तभाने अतिशय घाबरलेल्या स्थितित मार्केटमधे आले. त्यांनी त्यांचा मित्र रूपेशला जवळ बोलावले व अपघात झाल्याचे सांगितले. ते अपघातग्रस्त दोन तरुणांना सोबत घेऊन आले होते. अपघातात एकाकडील मोबाइल फुटला; त्यांना चार हजार द्यायचे आहे. तुला गावात परत करतो, असे त्यांनी रूपेशला म्हटले. त्यावेळी धीरज बारबुद्धे दुरूनच त्या दोघांना पाहत होते. त्या दोघांना कुठे पाहिले असेल, हे आठवत असतानाच, हेच दोघे भुयार यांच्यासोबत घरी आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे धीरज बारबुद्धे यांनी रूपेशला बोलावून आपबीती कथन केली तसेच त्या भामट्यांना गोष्टीत गुंतवून ठेवण्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान त्यांनी गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे धीरज बारबुद्धे यांनी भुयार यांच्याशी संपर्क करून पोलिसांना सोबत घेऊन येण्यास सांगितले. यादरम्यान त्या भामट्यांना संशय आला आणि त्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. हा सर्व प्रकार बाजार समितीच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती आहे.
व्हॉट्सअॅपवर जनजागृती
माझ्यासोबत दोनवेळा असा प्रसंग घडला आहे. बाजार समितीतील ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार आहे. पण, इतवारा बाजार ते नवीन काँटन मार्केट दरम्यान कुणासोबतही असा प्रकार घडल्यास त्यांनी दक्षता घ्यावी व लगेच पोलिसांसोबत संपर्क करावा, अशी माहिती धीरज बारबुद्धे यांनी व्हॉट्सअॅप समूहावर व्हायरल केली.
येथे करावा संपर्क
अपघात घडवून मोबाइल फुटल्याचा बनाव करणारे दोन तरुण आढळल्यास, त्यांच्याविषयीची माहिती शहर पोलिसांचा १०० किंवा ०७२१-२५५१०० तसेच ग्रामीण पोलीस दलाच्या ०७२१-२६६५०४१ या क्रमांकावर द्यावी.