सावधान! खात्यातून रोख होऊ शकते गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 11:34 PM2017-10-03T23:34:29+5:302017-10-03T23:34:41+5:30
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँक खात्यातूनच थेट ८० हजारांची रोख काढून घेण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कोतवाली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँक खात्यातूनच थेट ८० हजारांची रोख काढून घेण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कोतवाली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. आठ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे सायबर गुन्ह्याच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
कस्बेगव्हाण येथील रहिवासी अरविंद सीताराम हाडोळे नामक इसमाचे कुटुंबीय श्रीकृष्ण पेठ परिसरात हल्ली मुक्कामास आहेत. ते शाम चौकातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे खातेदार असून त्यांच्याकडे एटीएम कार्ड आहे. मंगळवारी सकाळी हाडोळेंच्या मोबाईलवर अचानक ८० हजार रुपये विड्रॉल झाल्याचे संदेश प्राप्त झाला. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याशी चर्चा केली. साधारणत: सायबर गुन्ह्यातील धागेदोरे हे परराज्यातील आहेत. अज्ञात मोबाईल क्रमांकावरून कॉल करून एटीएमची माहिती मिळविल्यानंतर खात्यातून पैसे काढून घेण्याचे अनेक गुन्हे पोलिसांकडे नोंदविले जातात. मात्र, कोणीही फेक कॉल करून एटीएम पीन किंवा ओटीपी क्रमांक विचारला नसतानाही बँक खात्यातूनच थेट पैसे काढण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी एसबीआयच्या खातेदारासोबत घडला.
बँकरवर कारवाईची शक्यता
बॅक खात्यातून पैसे काढण्याच्या प्रकार अधिकारी,कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे होण्याची शक्यता तक्रारकर्ता हाडोळेंनी व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी एसबीआयच्या बॅक अधिकाºयांना चौकशीकरिता बोलाविले होते.
आठ दिवसांत दुसरी घटना
आठ दिवसांपूर्वी स्टेट बँक आॅफ इंडियातील एका खातेदारांच्या खात्यातून ८० हजारांचीच रोख काढून घेण्यात आली आहे. याबाबत आयटी अॅक्टनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मात्र, तपासकार्यात पोलिसांनाही बँकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते प्रकरण थंडबस्त्यात आहे. त्यातच मंगळवारी हाडोळे यांच्या बँक खात्यातून ८० हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.
एटीएम 'क्लोन'चा संशय
एटीएम क्लोन करून दुसºया एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्याचे प्रकार आता सुरू झाल्याची शंका पोलिसांनी वर्तविली आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावे असणारे सिमकार्ड हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन पोच घेणे आणि त्याच पोचद्वारे त्याच व्यक्तीच्या नावे दुसरे सिमकार्ड कंपनीकडून घेण्याचे फंडा सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. त्याचप्रकारे ८० हजारांची रोख बँक खात्यातून काढण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांचा आहे.