सावधान, गाई, म्हशी मोकाट सोडताय, आता थेट ‘एफआयआर’च होणार!
By प्रदीप भाकरे | Published: July 27, 2024 02:09 PM2024-07-27T14:09:43+5:302024-07-27T14:14:55+5:30
महापालिका आयुक्तांचे निर्देश : वाहतुकीला अडचण निर्माण झाल्यास जनावरे जप्ती मोहिम
अमरावती: शहरातील विविध रस्त्यांवर, चौकात मोकाट गाई, गुरांचा कळप दृष्टीस पडतो. रस्त्यावर जनावरांनी मांडलेल्या ठिय्यामुळे अपघात देखील संभवतो. त्यापार्श्वभूमीवर आता आपले पशू मोकाट सोडणाऱ्यांविरूध्द थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. न्यायालयात दंड भरल्यानंतरच त्या पशुंची सुटका करण्यात येणार आहे. तसे निर्देश महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिले आहेत. महापालिकेचे पशुशल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे यांनी बैठकीदरम्यान शहरातील नोंदणीबध्द पशूंची संख्या व अनुषंगिक नियमांची माहिती दिली.
महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये २६ जुलै रोजी महापालिका सभागृहात जनावरे पाळण्यासंबंधी नियमन तसेच सर्व उत्पत्ती नियंत्रण उपक्रमाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत महानगरपालिकेमार्फत उपद्रवी व मोकाट स्वरूपात असलेली जनावरे बंदिस्त करताना येणाऱ्या अडचणी व कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार यापुढे जनावरे मोकाट सोडत असताना वाहतूक पोलीस तथा संबंधित पोलीस स्टेशनची परवानगी घेेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जनावरे पाळण्यासंबंधीदेखील जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकाऱ्याचा परवाना देखील असणे अनिवार्य आहे. मात्र त्यासाठी देखील महानगरपालिकेची ना हरकत घ्यावी लागेल. जनावरे पाळण्यासंबंधी परवाना काढला नसल्यास जनावरे मोकाटसमजून महानगरपालिकेच्या पथकाद्वारे जप्त करण्यात येतील. तसेच ती पकडण्यात आलेली जनावरे व जनावर मालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच कोर्टासमोर जाऊन दंडात्मक कारवाई केल्यानंतर जनावरे सोडण्यात येतील, असे महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी स्पष्ट केले.
मोकाट श्वानांबाबत हेल्पलाईन
अलिकडे शहरात मोकाट श्वानांची संख्या वाढली असून, काही ठिकाणांहून तक्रारीदेखील प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने मोकाट श्वानांबाबत तक्रारीसाठी हेल्पलाइन गठित करण्यात आली असून, त्यात स्वास्थ निरिक्षक पंकज कल्याणकर, सागर मैदानकर व निलेश सोळंके यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. जनावरासंबंधी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ८९, ९०, ९१, ९२, १०० व १०६ अन्वये अनधिकृत पशुपालनासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
नियम पाळून करा पशुपालन
या बैठकीस पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी, वाहतूक पोलीस निरिक्षक रिता उईके, कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके, पोलीस निरीक्षक व्ही. एस आलेवार व समाधान वाटोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नियम पाळूनच जनावरांचे पालन करावे. जेणेकरून उपद्रवी पशुपालनामुळे नागरिक, लहान मुलांची जीवित हानी वा अपघात होणार नाही, या सर्व बाबींवर उपयोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.