सावधान ! जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

By admin | Published: September 18, 2016 12:18 AM2016-09-18T00:18:08+5:302016-09-18T00:18:08+5:30

डेंग्यूचा जिल्ह्यात पुन्हा शिरकाव झाला आहे. गेल्या १५ दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आले असून डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Be careful! Dengue infusion in the district | सावधान ! जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

सावधान ! जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

Next

आरोग्य यंत्रणा सतर्क : १५ दिवसांत इर्विनमध्ये दोन रुग्ण दाखल
अमरावती : डेंग्यूचा जिल्ह्यात पुन्हा शिरकाव झाला आहे. गेल्या १५ दिवसात जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आले असून डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्ह्यात तापसदृश आजाराचे सद्यस्थितीत थैमान सुरु आहे. दररोज शेकडो रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मागील १५ दिवसात ताप आजाराचे हजारांवर रुग्ण दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये २९ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत २९३ तापाचे रुग्ण दाखल करण्यात आले.
३०९ तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले आहे. त्यामध्ये टायफाईटचे ३७ पॉझिटीव्ह आढळून आलेत. त्याचप्रमाणे ५ ते ११ सप्टेंबरपर्यंत ३६१ तापाचे रुग्ण दाखल झाले असून ३३० रुग्णांचे रक्तनमुने तपासणीत ६७ रुग्ण टायफाईटचे पॉझिटीव्ह आढळून आले आहे. दरम्यान या दोन आठवड्यात जिल्ह्यातील विविध भागातून दोन डेंग्यूचे रुग्ण दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षात जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे शंभरावर रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन ते तीन जणांचा मृत्यू देखील झाला होता. आता पुन्हा डेंग्यूचे रुग्ण दाखल होत असल्याचे आढळून आले असून नागरिकांनी सतर्क राहून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सकांसह आरोग्य यंत्रणेने केले आहे. शहरातील सर्वत्र रुग्णालये तापाच्या रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झाली आहे.

परिचारिका संसर्गाच्या विळख्यात
तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने त्यांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या परिचारिकाच संसर्गाच्या विळख्यात सापडल्या आहेत. एकीकडे परिचारिकांची कमतरता आहे, तर दुसरीकडे वार्डात रुग्णांची संख्या अधिक आहे. या सर्व रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात परिचारिकांची दमछाक होत आहे. काही परिचारिकांना तापाचा संसर्ग झाल्याने त्यांना सुध्दा उपचारांची आवश्यकता भासत आहे.

डीएचएफ काय आहे
डेंग्यू हेमरेजिक फिवर हे डेंग्यूचे गंभीर रुप आहे. त्यामध्ये सुरुवातीची लक्षणे सामान्य असू शकतात, परंतू काही दिवसांतच हा आजार गंभीर होतो. योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यूची भीती असते. प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते. रक्तदाब कमी होतो. ह्यदयाचे ठोके वाढतात, नाक, तोंड आणि हिरड्यांमधून रक्त निघते.

डेंग्यूची लक्षणे
चार ते पाच दिवसापर्यंत ताप राहणे, खुप जास्त डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा वाटणे, काखेत, हातावर, तोंडावर कानावर पुरळ येणे, रक्त निघणे, मळमळ वाटणे, उल्टी येणे व पोट दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. डेंग्यूचे एडिज एजिप्ती डास हे दिवसाच चावतात.

डेंग्यू रुग्णांची काळजी कशी घ्याल
डेंग्यू सदृश रुग्णाला खाण्यामध्ये जास्तीत जास्त पाणी व द्रव पदार्थ द्यायला पाहिजे. ताप आणि अंगदुखीवर डॉक्टरांच्या सल्याने औषधी घ्यावी, हलके आणि पचेल असे भोजन द्यायला हवे, मच्छर पळविण्याऱ्या रेपेलेंटसचा वापर करायला हवा. काळजी घेणे हाच सर्वाेत्तम उपचार आहे.

हे आहेत प्रतिबंधक उपाय
मच्छरदाणीचा वापर करा, डासांवर नियंत्रण आणि त्याचे समुळ उच्चाटन हाच प्रभावी उपाय आहे. नागरिकांनी कुठल्याही स्थितीत पाणी जमा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. फुलपॅन्ट आणि पुर्ण बाह्यांचे शर्ट घालावे, डासांना दुर ठेवण्यासाठी अंगाला औषध लावणेही डेंग्युपासून दुर राहण्याचा रामबाण उपाय आहे. याखेरिज प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Be careful! Dengue infusion in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.