सावधान ! तान्हुले पळविणारी टोळी सक्रिय

By admin | Published: August 21, 2016 11:56 PM2016-08-21T23:56:11+5:302016-08-21T23:56:11+5:30

पाळण्यात निजलेल्या बाळांना घरात शिरून पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्कार्फधारी युवकांचा सर्व शक्तीनिशी प्रतिकार करून बाळाच्या आजीने पिटाळून लावले

Be careful! The fledgling tribe is active | सावधान ! तान्हुले पळविणारी टोळी सक्रिय

सावधान ! तान्हुले पळविणारी टोळी सक्रिय

Next

खळबळ : पाळण्यातील बाळ पळविण्याचा प्रयत्न
अमरावती : पाळण्यात निजलेल्या बाळांना घरात शिरून पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्कार्फधारी युवकांचा सर्व शक्तीनिशी प्रतिकार करून बाळाच्या आजीने पिटाळून लावले. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वस्तिक नगरात घडली. या घटनेमुळे शहरात तान्हुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बडनेरामार्गावरील स्वस्तिक नगरातील रहिवासी सचिन बापूराव कोंडे (३५) यांच्या घरात शनिवारी दोन अज्ञात स्कार्फधारी युवक शिरले होते. कोंडे कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर गेले होते तर बच्चे कंपनी शाळेत गेली होती. दरम्यान सचिन यांच्या आई शोभा सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरी एकट्याच होत्या. सचिन यांची वर्षभराची चिमुकली पाळण्यात निजली होती. शोभा कोंडे या तिला झोके देत होत्या. तेवढ्यात दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी कोंडे यांच्या घरात प्रवेश केला. घरात थोडा अंधार असल्यामुळे अनोखळी युवकांना ओळखण्याचा प्रयत्न शोभा कोंडे यांनी केला. मात्र, युवकांनी काहीच न बोलता पाळण्यातून बाळ काढण्याचे प्रयत्न सुरू केले. ही बाब लक्षात येताच शोभा यांनी युवकाला लाथ लगावली. या आकस्मिक हल्ल्याने घाबरलेल्या युवकांनी शोभा यांना भिंतीच्या दिशेने जोरदार धक्का दिला आणि ते निघून गेले. त्यांचे डोके भिंतीवर आदळल्याने त्यांना दुखापत झाली.
हा प्रकार घडताच शोभा कोंडे यांनी आरडाओरडा सुरू केला. लगेच शेजाऱ्यांनी कोंडे यांच्या घरात धाव घेतली. तोपर्यंत दोन्ही अज्ञात युवक तेथून पसार झाले होते. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी परिसरात त्या अज्ञात युवकांची शोधाशोध सुरू केली होती. घटनेची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

नागरिक सतर्क
स्वस्तिकनगरातील गजानन महाराज मंदिरात संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी सचिन कोंडे यांच्या घरी घडलेल्या प्रकारावर चर्चा करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याच्या मुद्यावर मंथन करण्यात आले. पोलीस नियंत्रण कक्ष व राजापेठ ठाण्याचे क्रमांक सर्वांनी माहिती करून घेतले.

वर्षभरापूर्वीही
झाला होता प्रयत्न
वर्षभरापूर्वी सचिन कोंडे यांचे धाकटे बंधू अमोल यांची मुलगी घराच्या आवारात खेळत होती. दरम्यान अज्ञात इसमाने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळीसुद्धा अज्ञाताचा हा डाव फसला होता, अशी माहिती कोंडे यांच्या कुटुंबियांनी दिली. यामुळे कोंडे कुटुंब अस्वस्थ आहे. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा त्यांना आहे.

बाळाला ताब्यात घेऊन आजीला धमकावून घरात चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटे कोंडे यांच्या घरात शिरले असावेत. तक्रारकर्त्यांचे कोणाशी वैर नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वैरभावनेतून हा प्रकार नसावा. परिसरातील सीसीटीव्ही तपासणी करून आरोपींचा शोध घेऊ.
- शिशीर मानकर,
पोलीस निरीक्षक, राजापेठ

Web Title: Be careful! The fledgling tribe is active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.