सावधान! मूत्रपिंडाच्या आजारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:22 PM2019-01-14T23:22:48+5:302019-01-14T23:23:12+5:30
पश्चिम विदर्भात मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी आजार व प्लास्टिक सर्जरीचे एकाच महिन्यात ११४६ रुग्णांची शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात आली, तर ३ हजार ६५ रुग्णांनी तपासणी करवून घेतली.
इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पश्चिम विदर्भात मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी आजार व प्लास्टिक सर्जरीचे एकाच महिन्यात ११४६ रुग्णांची शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात आली, तर ३ हजार ६५ रुग्णांनी तपासणी करवून घेतली.
विदर्भातील रुग्णांना मूत्रपिंड (किडनी) चे आजार, त्याचे प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी या महत्त्वाच्या व खर्चिक उपचारासाठी नागपूर येथेच जावे लागायचे. ग्रामीण भागातील रुग्णांना ते सहज शक्य नव्हते. त्यामुळे त्यांची असुविधा होत असे. ही गरज ओळखून अमरावती येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. यामुळे पश्चिम विदर्भातील व लगतच्याच मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यातील रुग्णांसाठी हे रुग्णालय सोयीचे ठरत आहे. तसेच गोरगरीब रुग्णांना परवडणारे आहे. येथे मोफत उपचार मिळतो. यामुळे अशा रुग्णांची नागपूर, मुंबईची महागडी वारी टळली आहे. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीमध्ये सन २०१८ मध्ये किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. ते अल्प खर्चात झाल्याने येथे वाशीम, बुलडाणा, अकोला, यवतमाळसह मध्य प्रदेशातील रुग्णांचा कल वाढला आहे.
व्यायामाचा अभाव मूत्रपिंड विकारास कारणीभूत
धकाधकीच्या जीवन शैलीत कामाची व्यस्तता अधिकच वाढली आहे. कष्टाची कामे लोप पावल्यामुळे मानवाला मोकळे फिरणे, व्यायाम करणे अशक्य झाले आहे. कमी कष्टातून अधिक मोबदला मिळावा, याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शरीराचा व्यायामच होत नसल्याने विशेष करून मूत्रपिंडाचे आजार बळावत आहे.
स्वच्छतेवर विशेष भर
शासकीय रुग्णालये म्हटले की, अस्वच्छतेचा कळस डोळ्यासमोर येतो. मात्र, येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात स्वच्छतेवर विशेष भर दिली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे रुग्णांचा अर्धा आजार आपसुकच बरा होण्यास मदत होत असल्याची भावना रुग्णांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तंबाखुयुक्त पदार्थ खाण्यास येथे सक्त मनाई असून, एखादा आढळल्यास दंडाची तरतूद रुग्णालय समितीने केली आहे.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डिसेंबर महिन्यात ३ हजार ६५ रुग्णांनी तपासणी करवून घेतली. त्यापैकी एक हजार १२ रुग्ण विविध उपचारासाठी भरती झाले होते.
- तुलसीदास भिलावेकर, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी