सावधान ! सिझनेबल गुन्हेगार सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 09:26 PM2017-09-29T21:26:10+5:302017-09-29T21:26:28+5:30

दरवर्षी सणासुदीच्या दिवसांमध्ये चेनस्नॅचिंग, डिक्कीतील रोकड चोरणे, बँकेतून पैसे काढताच बॅग चोरून नेण्याच्या घटना घडतात. यंदाही ती शक्यता नाकारता येत नसून या सण-उत्सवाच्या दिवसांमध्ये काही परप्रांतीय गुन्हेगार सक्रीय ......

Be careful! Seasonal criminals activated | सावधान ! सिझनेबल गुन्हेगार सक्रीय

सावधान ! सिझनेबल गुन्हेगार सक्रीय

Next
ठळक मुद्देपरप्रांतियांचा समावेश : बाजारपेठेत फिरताना दागदागिने व पैसे सांभाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दरवर्षी सणासुदीच्या दिवसांमध्ये चेनस्नॅचिंग, डिक्कीतील रोकड चोरणे, बँकेतून पैसे काढताच बॅग चोरून नेण्याच्या घटना घडतात. यंदाही ती शक्यता नाकारता येत नसून या सण-उत्सवाच्या दिवसांमध्ये काही परप्रांतीय गुन्हेगार सक्रीय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यादृष्टीने पोलीस यंत्रणा सतर्क असली तरी नागरिकांनी या ‘सिझनेबल’ गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरवर्षीच दुर्गा उत्सवाच्या पर्वावर चेनस्नॅचिंगच्या घटना घडतात. घाण अंगावर टाकून नागरिकांकडून रोकड लंपास करण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याचे आढळून आले आहे. या घटनांमागे काही परप्रांतीयांचा हात असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. तामीळनाडू, छत्तीसगढ, मध्यप्रदेश व कर्नाटक अशा विविध राज्यातून चोरांच्या टोळ्या विदर्भात येतात. अशा गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान दरवर्षीच पोलिसांसमोर असते.
सद्यस्थितीत दुर्गा उत्सव संपत आला असून दिवाळी सणाची तयारी सुरु झाली आहे.दिवाळीनिमित्त बहुतांश नागरिक बँकेतून रोख काढून बाजारपेठेत खरेदीसाठी जातात. अशांवर हे ‘सिझनेबल गुन्हेगार’पाळत ठेऊन असतात. या गुन्हेगारांना अटकाव करण्यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. बँकेतील पैसे काढताना सोबत एखादा तरी सहकारी ठेवा, अज्ञात व्यक्ती दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे का किंवा पाठलाग करीत आहे का, याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बॅकेतून रोख काढल्यावर दुचाकीच्या डिक्कीत किंवा वाहनात ठेवणे धोक्याचे ठरू शकते. बॅकेसमोर ठेवलेली दुचाकी किंवा चारचाकी पंक्चर झाली असेल, तरी स्वत:कडील रोख सांभाळून ठेवा, गुन्हेगार त्यांच्या डाव साधण्यासाठी वाहनाची हवा सोडू शकतात किंवा तुमच्या अंगावर घाण टाकून पैसे लंपास करू शकतात. त्यामुळे शहरात पोलीस यंत्रणा सज्ज असली तरी नागरिकांनीही सजगता बाळगणे अगत्याचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

उत्सवाच्या दिवसांत गुन्हेगार सक्रीय होतात. पोलीस यंत्रणा सज्ज असली तरी नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नागरिकांनी संशयितांची माहिती पोलिसांना द्यावी.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.

Web Title: Be careful! Seasonal criminals activated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.