सावधान ! शहरात पसरतोय ‘स्वाईन फ्लू’

By admin | Published: April 12, 2017 12:32 AM2017-04-12T00:32:54+5:302017-04-12T00:32:54+5:30

विलासनगर भागातील दोघांचा ‘स्वाईन फ्लू’ने बळी घेतल्याने शहरात या रोगाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते.

Be careful! 'Swine flu' spreads in city | सावधान ! शहरात पसरतोय ‘स्वाईन फ्लू’

सावधान ! शहरात पसरतोय ‘स्वाईन फ्लू’

Next

अमरावती : विलासनगर भागातील दोघांचा ‘स्वाईन फ्लू’ने बळी घेतल्याने शहरात या रोगाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. अमरावती महापालिकेने आतापर्यंत पाठविलेल्या १६ नमुन्यांपैकी ११ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी ५ ‘स्वॅब सॅम्पल’ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पैकी दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी यासंदर्भात महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी आढावा घेतला. यात हे निष्कर्ष ठेवण्यात आले. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत हे सुद्धा उपस्थित होते. नागरिकांनी घाबरून न जाता ‘स्वाईन फ्लू’ची प्राथमिक लक्षणे दिसल्यास त्वरीत तपासणी करून औषधोपचार घ्यावेत, असे संयुक्त आवाहन आयुक्त हेमंत पवार आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे. महापालिका क्षेत्रातील खासगी डॉक्टरांना त्यांच्याकडे औषधोपचाराकरिता आलेल्या रूग्णांमध्ये ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आढळल्यास त्यारूग्णाला तातडीने तपासणी आणि औषधोपचाराकरिता जिल्हा सामान्य रूग्णालयात संदर्भित करण्याच्या सूचना महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. ‘स्वाईन फ्लू’ टाळण्यासाठी गृहभेटींवर भर देण्यात येणार आहे.
विलासनगर येथिल एका ४० वर्षीय महिलेचा ३० मार्च रोजी तर कपिलवस्तू नगर येथिल ६५ वर्षीय वृद्धाचा ६ एप्रिलला जिल्हा सामान्य रूग्णालयात औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अधिक सजग झाले आहे. शहरातील स्वच्छता अबाधित राखून वराहांचा हैदोस टाळण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. विलासनगर भागातील स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे महापौरांसह उपस्थितांनी सांगितले. पुणे आणि नाशिक शहरात स्वाईन फ्लू ने कहर माजविला असताना जिल्ह्यातही या आजाराने तीन बळी घेतले आहेत. त्यातील दोन बळी विलासनगर आणि त्याशेजारच्या कपिलवस्तूनगर मधील असल्याने महापालिका क्षेत्रात स्वाईनची तीव्रता वाढली आहे.

सहा स्वॅब निगेटिव्ह
अमरावती : त्याअनुषंगाने विविध उपाययोजना सूचविण्यात आल्या. ‘स्वाईन फ्लू’ बाबत इर्विनमधील वार्ड क्रमांक ९ मधून १६ रूग्णांचे ‘स्वॅब’ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या १६ संशयितांमध्ये विलासनगर, अर्जूननगर, लालखडी, फ्रेजरपुरा, अंबाविहार नवीवस्ती बडनेरा, राजेंद्र कॉलनी, कमेला ग्राउंड आदी भागातील रूग्णांचा समावेश आहे. १३ शहरी आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन गृहभेटींवर भर दिला जात आहे. स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळल्यास उपचाराकरिता मनपा दवाखाने अथवा इर्विनमध्ये हलविण्याच्या सूचना मनपाने दिल्या आहेत. विलासनगर भागात दोन बळी : प्रभावी उपाययोजनेसाठी महापालिका सरसावली
हस्तपत्रके, होर्डिंग्जच्या माध्यमातून जागृती
महापालिकेतील १३ शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत हॉस्पिटल, नर्सिंग होम व इतर खासगी दवाखान्यांना दैनंदिन भेटी द्याव्यात तसेच त्यांच्याकडे ‘स्वाईन फ्लू’ आजाराच्या रुग्णाची माहिती दैनंदिन सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले. जनजागृतीच्या दृष्टीकोनातून मनपा कार्यक्षेत्रात मोठे होर्डिंग, स्थानिक केबल नेटवर्कद्वारे प्रसिद्धी, वृत्तपत्रातून प्रसिद्धी, हस्तपत्रके वाटप करण्याबाबत याबैठकीत सांगण्यात आले.

लोकप्रतिनिधींची घ्यावी मदत
शहरातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन त्यांच्या प्रभागात ‘स्वाईन फ्लू’बाबत जनजागृती करावी, अशी सूचना करण्यात आली. बैठकीला उपायुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राऊत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, आरएमए संघटना अमरावतीचे अध्यक्ष बी.आर.देशमुख, बालआरोग्य तज्ज्ञ संघटना अमरावतीचे संदीप दानखेडे, वैद्यकीय अधिकारी सुषमा ठाकरे, जयश्री नांदुरकर, वासंती कडू, रंजना बनारसे, स्वाती कोवे, भाग्यश्री सोमानी, सुषमा भगत, वैशाली मोटघरे, प्रतिभा आत्राम, देवेंद्र गुल्हाने, हेमंत बेथारिया, शंडे, विक्रांत राजुरकर, विजय मोटघरे, संदीप पाटबागे, फिरोज खान, रवी सूर्यवंशी, तोटे, बेबी इंदुरकर उपस्थित होते.

Web Title: Be careful! 'Swine flu' spreads in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.