सावधान! चायनिज खाद्यपदार्थात घातक अजिनोमोटोचा वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:14 AM2021-09-18T04:14:51+5:302021-09-18T04:14:51+5:30
अमरावती/ संदीप मानकर जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नागरिक चायनिज पदार्थ आवडीने खातात. मात्र, टेस्टींग पावडर म्हणून ओळख असलेला अजिनोमोटो आरोेग्याला ...
अमरावती/ संदीप मानकर
जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नागरिक चायनिज पदार्थ आवडीने खातात. मात्र, टेस्टींग पावडर म्हणून ओळख असलेला अजिनोमोटो आरोेग्याला हानीकारक असताना चायनिज पदार्थांचा सर्रास वापरला जात आहे. त्यामुळे अनेकांना नकळत पोटाचे विकार बळावत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली.
कोरोनाकाळात चायनिज पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या बंद होत्या. मात्र, आता अनलॉकमध्ये शिथिलता मिळताच शहरातील पंचवटी, बियाणी, राजकमल, गाडगेनगर चौक अशा मुख्य चौकात चायनिज खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या लागतात. या ठिकाणी नूडल्स, मंचुरियम व इतर खाद्यपदार्थ विक्री होते. ५० पासून तर १५० रुपयापर्यंत या पदार्थांची प्रतिप्लेट विक्री केली जाते. मात्र, पदार्थ चविष्ट होण्याकरिता मिठासारखे दिसणाऱ्या अजिनोमोटोचा टेस्टिंग पावडर म्हणून वापर केला जातो. याचा अतिप्रमाणात सतत सेवन केल्यास आतड्याचे, पोटाचे कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तविले.
बॉक्स:
काय आहे अजिनोमोटो?
अजिनोमोटोला मोनो सोडियम ग्लूटामिट (एमएसजी) असे म्हणतात. तज्ज्ञानुसार ग्लूटामिट ॲसिडचे ते सोडियम मीठ आहे. हे नैसर्गिकरीत्या पदार्थ वापरून निर्मित केलेले रासायनिक उत्पादन आहे. याचा वापर पूर्वी इतर देशात व्हायचा. पण आता भारतातसुद्धा चायनिज पदार्थ व इतर पदार्थांमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो.
बॉक्स:
लहान मुलांमध्ये फॅट
चायनिज पदार्थ खाण्याची आवड लहान मुलांसह तरुणांना अधिक असते. त्यांच्या पोटात जाणारे चविष्ट चायनिज पदार्थांत अजिनोमोटोचा वापर अतिप्रमाणात झासल्याने तो शरीरासाठी हानीकारक ठरून त्यांना न कळत पोटाचे विकार होत असल्याचे वास्तव आहे.
बॉक्स:
नॉनव्हेज पदार्थातही वापर
अनेक हॉटेलमध्ये भाजीला चव येण्याकरिता नॉनव्हेज पदार्थ, अंडाकरी तसेच इतर भाज्यांमध्येसुद्धा अजिनोमोटोचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे नागरिकांना नकळत जेवणातून घातक आजार मोफत मिळत आहेत.
कोट
अजिनोमोटोयुक्त अन्न पदार्थ सेवन केल्याने पोटाचे विकार होतात. आतड्यांसाठी ते घातक असून भविष्यात अल्सरसुद्धा होऊ शकतो. असे पदार्थ खाणे टाळावे.
- डॉ. प्रवीण बिजवे, एमएस सर्जन, अमरावती