सावधान! यंदा राहणार कडाक्याचा उन्हाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:20 PM2018-03-03T22:20:05+5:302018-03-03T22:20:05+5:30
सावधान! यंदाचा उन्हाळा भीषण आग ओकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दिवसाचे तापमान अधिक तीव्र व नुकसानदायी राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : सावधान! यंदाचा उन्हाळा भीषण आग ओकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दिवसाचे तापमान अधिक तीव्र व नुकसानदायी राहण्याची शक्यता वर्तविली आहे. विशेष म्हणजे, विदर्भात पुन्हा वादळी पाऊसासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली असून, ७, ८ व ९ मार्च दरम्यान हे संकट येणार असल्याचे भाकीत हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी केले आहे.
जम्मू-कश्मीर व पाकिस्तानवर चक्राकार वाºयांच्या स्वरूपातील पश्चिमी विक्षोभाची स्थिती असल्याने वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा १ ते २ अंशाने तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सियसने अधिक होते. किमान तापमान बहुतेक ठिकाणी दीड ते तीन अंशाने जास्त होते. ४ मार्चपर्यंत तापमानात विशेष फरक पडणार नसून, ५ मार्चपर्यंत हवामान कोरडे व आकाश किंचित ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ६ ते ८ मार्च दरम्यान मध्य भारतात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तापमान ४५ अंश सेल्सियसवर जाणार; हवामान तज्ज्ञांची माहिती
यंदा उन्हाळ्यात बहुतेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. मध्य भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा एका अंशाने वाढण्याची शक्यता आहे. या वाढत्या तापमानाची विदर्भात भीषणता अधिक जाणवणार आहे. देशभरातील ज्या-ज्या ठिकाणी उष्णतेच्या लाट राहील, तेथे उष्णतेचा उग्र परिणाम जाणवणार असल्याचे संकेत हवामानतज्ज्ञ बंड यांनी दिले आहे. सरासरी तापमान एका अंशाने वाढणार असले तरी तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशाने वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेचा प्रभाव जिवाची लाहीलाही करणारा ठरणार आहे. दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सियसच्या वर जाण्याचे संकेत आहेत.