बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणा!
By admin | Published: April 15, 2017 12:05 AM2017-04-15T00:05:11+5:302017-04-15T00:05:11+5:30
समाजातील विषमता दूर होऊन सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळ उभारली.
कुलगुरुंचे प्रतिपादन : डॉ.आंबेडकर अभ्यास केंद्रात जयंती साजरी
अमरावती : समाजातील विषमता दूर होऊन सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळ उभारली. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाधिष्ठित समाज निर्माण व्हावा, यासाठी दिलेले विचार प्रत्यक्षात कृतीतून व्यवहारात आणा, असे प्रतिपादन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले.
डॉ.आंबेडकर अभ्यास केंद्रात बाबासाहेबांची जयंती ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित व्याख्यानात अध्यक्षीय विवेचन करताना कुलगुरू बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र मुंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक तथा प्रभारी कुलसचिव जे.डी.वडते, वित्त व लेखा अधिकारी शशीकांत आस्वले, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके व केंद्राचे समन्वयक सचिन गायकवाड उपस्थित होते.
बाबासाहेबांचा जन्मदिवस ऐतिहासिक असा दिवस असून त्यांनी अखंडीतपणे उपेक्षित आणि शोषित समाजाच्या उत्थानाकरिता कार्य केले आहे. बाबासाहेबांच्या जीवन कार्याची विभागणी बालपण, शिक्षण आणि उच्च विद्याविभूषित अशा तीन विभागात करून त्यांच्या कार्यावर कुलगुरूंनी प्रकाश टाकला. बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. अनेक सत्याग्रह व चळवळी त्यांनी उभारल्या, पण हे करीत असताना त्यांनी संयम ठेवला, कधीही ते सुडबुद्धीने वागले नाहीत. आज बाबासाहेब महापुरुषांच्या श्रुंखलेत आहेत. त्यांचे विचार, कार्य आणि संपूर्ण जीवन पुढे नेण्याचा संकल्प आपण सर्वांनी करुया अशी अपेक्षा कुलगुरुंनी व्यक्त करुन बाबासाहेबांच्या जयंतीदिनी मानवंदना दिली.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पापर्ण कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक भाषण सचिन गायकवाड यांनी तर आभार व संचालन दीपक चोरपगार यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)