गरजेनुसार कठोर व्हा, खासगीत मात्र गोड वागा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:45 PM2019-01-23T22:45:27+5:302019-01-23T22:45:46+5:30
बरेचदा व्यवसायाची गरज किंवा हुद्याच्या गरजेनुसार इच्छा असूनही गोड बोलणे, प्रेमाने वागणे, संयम दाखविणे उपयोगी ठरत नाही. अशावेळी गरजेनुसार कठोरता प्रदर्शित करावी. तथापि, खासगीत वावरताना मात्र प्रेमभावाने वावरणे व्यक्तिमत्त्वातील आनंद वाढविणारा मंत्र होय, असा अनुभव नितीन देशमुख यांनी सादर केला.
अमरावती - बरेचदा व्यवसायाची गरज किंवा हुद्याच्या गरजेनुसार इच्छा असूनही गोड बोलणे, प्रेमाने वागणे, संयम दाखविणे उपयोगी ठरत नाही. अशावेळी गरजेनुसार कठोरता प्रदर्शित करावी. तथापि, खासगीत वावरताना मात्र प्रेमभावाने वावरणे व्यक्तिमत्त्वातील आनंद वाढविणारा मंत्र होय, असा अनुभव नितीन देशमुख यांनी सादर केला.
हॉटेल इंडस्ट्रीमधील अग्रणी नाव असलेले नितीन देशमुख सांगतात, काही पेशांमध्ये गोड बोलण्यामुळे व्यावसायिक नुकसान होण्याची शक्यता बळावते. हॉटेल इंडस्ट्रीचा पेशाही काहीसा तसाच आहे. पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना प्रत्येकाशीच गोड बोलणे पेशानुकूल ठरत नाही. वारंवार कायदा तोडणाºया सराईत गुन्हेगाराला ‘दादा-बापू’ अशा भाषेत समजविण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित परिणाम मिळणार नाही. अशावेळी गरज म्हणून, शिस्त म्हणून आवश्यक ती भूमिका घ्यायलाच हवी. परंतु, ती भूमिका आयुष्याचा, व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होणार नाही, याची दक्षता घ्यायलाच हवी. व्यावसायिक क्षेत्रांतून वैयक्तिक आयुष्यात शिरल्यावर वागणुकीत बदल केल्यास त्याचा लाभ मानसिक शांती मिळण्यास हमखास होतो.
वागणुकीतील गोडवा हा दिखाव्यासाठी नसावा, कृत्रिम नसावा. विशेष म्हणजे, काम काढून घेण्यासाठीचा मुळीच नसावा. हल्लीच्या आत्मकेंद्री जगात या कामकाढू गोडव्याचाच बोलबाला जास्त आहे. अशा गोडव्याच्या तुलनेत स्पष्टवक्तेपणा कधीही बरा. त्यात घातकता नसते, असे मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केले.