शेतीच्या वादातून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:23+5:302021-06-10T04:10:23+5:30
आसेगाव पूर्णा : वासनी बु. येथे शेतात ट्रॅक्टरने पट्टा मारत असलेल्या वडील-मुलाला राजकुमार अब्रुक (४९) बाळू अब्रुक व प्रतीक ...
आसेगाव पूर्णा : वासनी बु. येथे शेतात ट्रॅक्टरने पट्टा मारत असलेल्या वडील-मुलाला राजकुमार अब्रुक (४९) बाळू अब्रुक व प्रतीक राजकुमार अब्रुक (२३) यांनी लोखंडी अँलने डोक्यावर मारून जखमी केले. या घटनेच्या तक्रारीवरून आसेगावपूर्णा पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------
वाढोणा शिवारातून स्प्रिंकलर पाईप लंपास
तळेगाव दशासर : वाढोणा शिवारातील सचिन मूलचंद राठी (४५, रा. वाढोणा) यांच्या शेतातून २२ स्प्रिंकलर पाईप व ६० फुटांचा अखंड पाईप असा १७ हजार ४०० रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने ४ जून रोजी लंपास केले. याप्रकरणी ८ जून रोजी नोंदविलेल्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-------------
तळेगाव हद्दीत विवाहितेचा विनयभंग
मंगरूळ दस्तगीर : नजीकच्या दानापूर येथे पती कामाला गेल्यानंतर दार अर्धवट उघडे ठेवून झोपी गेलेल्या २८ वर्षीय महिलेच्या घरात शिरून अनिल एकनाथ शंभरकर (४०) याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ४५१ अन्वये गुन्हा नोंदविला.
-----------------
तारखेड येथे महिलेला मुलाकडून जिवे मारण्याची धमकी
तिवसा : तालुक्यातील तारखेड येथे मद्यपी मुलाने घराच्या बांधकामासाठी आणलेली गिट्टी नेण्यास विरोध केला म्हणून आईला टोपले मारून जिवे मारण्याची धमकी दिली. तिवसा पोलिसांनी दामू रामजी डाहे (३६) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
-------------
कुऱ्ह्यातील अवैध कत्तलखान्यावर धाड
कुऱ्हा : येथील कुरेशीपुऱ्यात अवैध कत्तलखान्यावर धाड टाकून पोलिसांनी शेख इरफान शेख अजीज (३६), अब्दुल रशीद अब्दुल लतीफ (५२) यांना अटक केली. त्यांच्याकडून गोमांस, सुरे व वजनकाट्यासह १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
------------
वडुरा शिवारातून कोंबड्या लंपास
गुरुकुंज मोझरी : कुऱ्हा येथील रहिवासी विनायक पोकळे (३७) यांनी वडुरा शिवाराच उभारलेल्या शेडमधून ३० कोंबड्या ७ जूनच्या रात्री अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. याप्रकरणी १८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्याद दाखल केली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी भादंविचे कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------
भंडारज शिवारातून बैलजोडी लंपास
अंजनगाव सुर्जी : भंडारज शिवारातील शेतातून सोकाऱ्याने बैलजोडी व बैलगाडी लंपास केल्याची तक्रार ओंकारराव पडोळे (६७, रा. भंडारज) यांनी अंजनगाव सुर्जी पोलिसांत नोंदविली. पोलिसांनी गंगाराम मोतीराम जामूनकर (रा. टेंब्रुसोंडा, ता. चिखलदरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------
कासमपूर येथून गाई लंपास
पथ्रोट : कासमपूर शिवारातून ७ जून रोजी अनंत कृष्णराव काळे व नामदेव रामाजी शनवारे यांच्या गाई अज्ञात चोरट्याने दोर कापून लंपास केल्या. ७ जूनच्या रात्री ही घटना घडली. पथ्रोट पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------