लोकसहभागातून मध्यवर्ती चौकांचे सौंदर्यीकरण!
By admin | Published: April 12, 2016 12:25 AM2016-04-12T00:25:01+5:302016-04-12T00:25:01+5:30
स्मार्ट सिटी नामांकन स्पर्धेत अव्वलस्थानी असलेल्या अमरावती शहरातील रस्ते दुभाजक आणि चौकांचे लोकसहभागातून सौंदर्यीकरण होणार आहे.
महापालिकेचा पुढाकार : स्मार्ट सिटीकडे पाऊल, सहकार्याचे आवाहन
अमरावती : स्मार्ट सिटी नामांकन स्पर्धेत अव्वलस्थानी असलेल्या अमरावती शहरातील रस्ते दुभाजक आणि चौकांचे लोकसहभागातून सौंदर्यीकरण होणार आहे. शहराच्या सौंदर्याला चार चांद लावण्यासाठी इच्छुक असलेल्या अमरावतीकरांसाठी महापालिका आयुक्तांनी आवाहन करून सकारात्मक पाऊल अंगिकारले आहे.
शहराला ऐतिहासिक व राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. त्यातच सद्यस्थितीत देशपातळीवर शहर स्मार्ट सिटी नामांकनाच्या स्पर्धेत आहे. शहरास अत्यंत सुंदर बनविण्यासाठी व जतन करण्यासाठी अमरावतीकरांचे सहकार्य आणि सहभाग लाभावा, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
शहरातील विविध चौक व रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरणासाठी कंत्राटदार, अभियंता स्थापत्य विशारद, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, नामवंत व्यक्तींनी समोर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाचीह झोनमधील निवडक चौकांचे व रस्ता दुभाजकांचे संकल्पचित्र बनवून त्याप्रमाणे बांधकाम करणे, त्यासाठी लागणारा खर्च स्वत: करणे, या अटीशर्तींवर हा लोकसहभाग अवलंबून राहणार आहे.
स्मार्ट सिटी नामांकन स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यातील संधीसाठी ‘अमरावती महापालिका’ ‘हॉट फेव्हरेट’ आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेकडे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असल्याने आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. आर्थिक अरिष्टांमुळे विकासकामातीलअडसर पाहता चौक व दुभाजकांच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिका यंत्रणेने शहरात विविध घटकांना समोर येण्याचे आवाहन केले आहे. आयुक्तांच्या या आवाहनाला शहरवासी कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या चौकांचे सौंदर्यीकरण अपेक्षित
सरोज चौक, शामनगर, कल्याणनगर, स्वामी विवेकानंद चौक, मोतीनगर, रुख्मिणीनगर, यशोदानगर, दस्तुरनगर, छत्रीतलाव चौक, हमालपुरा, राजेंद्र कॉलनी, प्रशांतनगर, वडाळी गार्डन चौक, फरशी स्टॉप, लक्ष्मीनारायणनगर, गणेशनगर, चवरे नगर चौक, शेगाव चौक, रहाटगाव चौक, विद्यापीठ चौक, बियाणी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, पंचवटी, कठोरा नाका, भुतेश्वर चौक, पुंडलिकबाबा चौक, मालटेकडी चौक, शिवाजी मार्केट चौक, आदर्श हॉटेल चौक, चांदणी चौक, तहसील चौक, प्रभात चौक, बापट चौक, पठाण चौक, लालखडी चौक, इदगाहगेट, अंबाविहार, पार्वतीनगर, छाया कॉलनी चौक, महेश्वर मंदिर चौक, अंबागेट आदी चौकांचे सौंदर्यीकरण अपेक्षित आहे.