धबधब्याने बहरले मेंढागिरीचे सौंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:47+5:302021-07-25T04:11:47+5:30
परतवाडा : सातपुडा पर्वताच्या शिखरावरील सपाट जंगली परिसरातून नाग नदी वाहताना तिचे पाणी, नदीच्या पाण्याचा प्रवाह सरळ सरळ शिखरावरून ...
परतवाडा : सातपुडा पर्वताच्या शिखरावरील सपाट जंगली परिसरातून नाग नदी वाहताना तिचे पाणी, नदीच्या पाण्याचा प्रवाह सरळ सरळ शिखरावरून अडीचशे फूट उंचीवरून मेंढागिरीवर कोसळते. यातूनच नैसर्गिक धबधबा अस्तित्वात आला आहे. परिसरातील हिरव्यागार वनराईने व नैसर्गिक धबधब्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मेंढागिरी (मुक्तागिरी) येथील नैसर्गिक सौंदर्याने बहरली आहे.
सातपुडा पर्वताच्या शिखरावरून कोसळणारा हा धबधबा पहाडावरील मनमोहक नैसर्गिक सौंदर्य, आणि मंदिरातील दर्शनीय अशा प्राचीन व अतिप्राचीन प्रतिमा बघण्याकरिता पर्यटक व भावीक या ठिकाणी येत आहेत. कोसळणाऱ्या धबधब्यातील पाण्याचे तुषार अंगावर घेत पर्यटक या ठिकाणी ओलेचिंब होत आहेत. हा धबधबा आणि त्यातून उडणारे पाण्याचे तुषार केवळ मुक्तागिरीलाच अनुभवास मिळत आहेत.
मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यात हे श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र आहे. परतवाडापासून पंधरा किलोमीटरवर ते आहे.हे सिद्धक्षेत्र दक्षिण भारताचे शिखरजी म्हणूनही ओळखल्या जाते. तीनशे फूट उंच पहाडावर सातपुडा पर्वताच्या कुशीत ते वसले आहे. साडेतीन करोड मुनीराजांना मुक्ती देणारे हे ठिकाण. मुनीश्वर व महान साधकांना या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाल्यामुळे मुक्तागिरी सिद्धक्षेत्र ठरले आहे.