बिअर बार, शॉपीलाही विरोध
By admin | Published: April 28, 2017 12:16 AM2017-04-28T00:16:33+5:302017-04-28T00:16:33+5:30
स्थानिक रुक्मिणीनगरातील महिला, पुरूषांनी दारुबंदीसाठी गुरुवारी एक्साईज, कलेक्ट्रेटवर धडक दिली.
रुक्मिणीनगरात उठाव : जिल्हाधिकारी, एक्साईजवर महिला धडकल्या
अमरावती : स्थानिक रुक्मिणीनगरातील महिला, पुरूषांनी दारुबंदीसाठी गुरुवारी एक्साईज, कलेक्ट्रेटवर धडक दिली. मुख्य मार्गावरील बियर शॉपी, बियर बार बंद करण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसांत दारूबंदी न केल्यास कायदा हातात घेऊ, असा इशारा येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील ५०० मीटरच्याआतील सर्व प्रकारची दारूविक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार जवळपास मद्यविक्रीच्या ८० टक्के दुकानांना फटका बसला आहे. मात्र, आता संपूर्ण शहरात दारूबंदीचे लोण पसरू लागले आहे. त्यानुसार रूक्मिणीनगरातील मुख्य मार्गावरील करण बियर शॉपी, संजय बियर बार देखील बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नगरसेविका डहाके यांच्या नेतृत्वात गुरूवारी अनेक महिलांनी एक्साईज कार्यालय गाठले. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेल्याचे कळताच दारूबंदीची मागणी घेऊन आलेल्या महिलांनी त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देऊन दारूबंदीची मागणी करण्यात आली.
आठवडाभरात रूक्मिणीनगरातून दारूविक्री बंद न केल्यास महिला कायदा हातात घेतील, असा इशारा देण्यात आला आहे. बियर शॉपी, बियर बारमध्ये होणाऱ्या दारूविक्रीमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे.