बेफिकीर अमरावतीकर... तिसऱ्या लाटेची नांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 05:00 AM2021-08-30T05:00:00+5:302021-08-30T05:01:03+5:30
कोरोनाचे रुग्ण कमी-जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. अनलॉकचा निर्णय घेताना सरकारने कोरोना नियमांचे काटेकोरोपणे पालन करावे, असे निर्देश जारी केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हॉटेल, दुकाने, प्रतिष्ठाने, शासकीय- निमशासकीय कार्यालयात कोरोना नियमांचे पालन करून व्यवहार करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. आता तर आठवडी बाजारही सुरू झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य सरकारने अनलॉक केल्यानंतर बाजारपेठेत नागरीक बेफिकिरीने वागत आहे. ९० टक्के नागरिकांच्या चेहऱ्यांवर मास्क दिसून येत नाही. गत आठवड्यात जिल्ह्यात सहा रुग्ण डेल्टा प्लसचे आढळून आले असतानाही कोरोनाची जराही भीती नाही, अशा तऱ्हेने नागरिक वागत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे हे संकेत मानले जात आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी-जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. अनलॉकचा निर्णय घेताना सरकारने कोरोना नियमांचे काटेकोरोपणे पालन करावे, असे निर्देश जारी केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हॉटेल, दुकाने, प्रतिष्ठाने, शासकीय- निमशासकीय कार्यालयात कोरोना नियमांचे पालन करून व्यवहार करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. आता तर आठवडी बाजारही सुरू झाले आहेत. मात्र, शारीरिक अंतराचा फज्जा, मास्कचा वापर नाही, सॅनिटायझरचा विषय कधीचाच संपला आहे. वाहनचालकही चेहऱ्यावर मास्क लावत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा दारावर तर उभा नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सात दिवसांत ३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा संसर्ग दर संथ वाटत आहे. तथापि, शून्य संसर्ग अद्याप अमरावतीकरांनी गाठलेला नाही. मात्र, या आकडेवारीकडे दुर्लक्ष करून बाजारात, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. कोरोनाचा भर ओसरताच नागरिकांचे लसीकरणाकडे पुन्हा दुर्लक्ष झाले आहे. शून्य ते १८ वयोगटातील लसीकरणाचेही नियोजन अद्याप पुढे आलेले नाही.
इतवारा बाजारात नियमांचा फज्जा
येथील इतवारा बाजारात रविवारी हातगाडी, भाजीपाले विक्रेते, फळविक्रेते, दुकानदारांच्या चेहऱ्यांवरून मास्क गायब होते. ग्राहकही खरेदी करताना चेहऱ्यावर मास्क लावत नाही, असे चित्र होते. रेटारेटी, गर्दी ही इतवारा बाजारात नित्याचीच बाब आहे. मात्र, आता कोरोना येणार नाही, अशा अविर्भावात दुकानदार, ग्राहक वावरू लागले आहे. त्यामुळे अमरावतीकरांच्या बेफिकिरीने लवकरच कोरोनाची तिसरी लाट येईल, असे चित्र आहे.
दुकाने, आस्थापनांचे संचालक कोरोना विसरले
शहरातील दुकाने, आस्थापना संचालक कोरोना नियमांचे पालन करीत नाही, हे वास्तव आहे. ग्राहकांना ना मास्क, ना सॅनिटायझर, ना शारीरिक अंतर, तरीही दुकानात प्रवेश मिळतो. कोरोना गेला असाच प्रकार सुरू आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाकडूनही कारवाईला ब्रेक लागला आहे. सर्व काही आलबेल असल्याप्रमाणे कारभार सुरू आहे.