प्रलंबित शस्त्रक्रियांना सुरुवात
By admin | Published: January 24, 2016 12:14 AM2016-01-24T00:14:02+5:302016-01-24T00:14:02+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वृध्द महिलांच्या प्रलंबीत शस्त्रक्रियाना शनिवारपासून सुरुवात झाली आहे.
१२ शस्त्रक्रिया होणार : 'आॅडिट' अहवाल पाठविणार आरोग्य उपसंचालकांकडे
अमरावती : यामध्ये प्रलंबित असलेल्या १२ शस्त्रक्रिया लवकरच होणार आहे. शस्त्रक्रियेसंबंधित तयार करण्यात आलेला 'आॅडिट' अहवाल आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
इर्विनच्या वॉर्ड क्रमांक १३ मध्ये १५ ते २० वृध्द हाडाच्या दुखण्यावर उपचार घेण्याकरिता दाखल झाल्या आहेत. अनेक दिवसांपासून या महिलांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. याबाबत 'लोकमत'ने वृत्ताच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या लक्षात आणली. त्यामुळे शुक्रवारी आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे यांनी वॉर्डाचा आढावा घेतला. यासंबंधी 'आॅडिट' करण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अशोक वणकर यांना दिली. या प्रलंबित शस्त्रकियांना शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तो आॅडिट अहवाल लवकरच आरोग्य उपसंचालकाकडे पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वीच वॉर्ड क्रमांक १३ मधील वृध्द महिलावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी कौशल्या सोनोने या महिलेला शस्त्रक्रियेकरिता नेण्यात आले होते. तसेच सोमवारी शकुंतला सावंत यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गेल्या महिन्याभरात १२ शस्त्रक्रिया प्रलंबित असून शनिवारी एका वृध्द महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. आॅडिट अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरु असून तो अहवाल आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात येईल.
अशोक वणकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.