भाजप गटनेत्याची वर्तणूक महिलांचा अवमान करणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:12 PM2018-10-06T23:12:31+5:302018-10-06T23:12:56+5:30
जिल्हा परिषदेची शनिवारी बोलावलेली सभा ही तहकूब सभा होती. विषयसूचीवर नवीन विषय अशा सभेत घेता येत नाहीत. असे असताना प्रवीण तायडे यांनी या मुद्द्यावर सदस्य अनिता मेश्राम यांच्याशी हुज्जत घातली. महिला सदस्यांचा अनादर करणारी त्यांची ही कृती निंदणीय असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेची शनिवारी बोलावलेली सभा ही तहकूब सभा होती. विषयसूचीवर नवीन विषय अशा सभेत घेता येत नाहीत. असे असताना प्रवीण तायडे यांनी या मुद्द्यावर सदस्य अनिता मेश्राम यांच्याशी हुज्जत घातली. महिला सदस्यांचा अनादर करणारी त्यांची ही कृती निंदणीय असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात पत्रपरिषद झाली. गोंडाणे पुढे म्हणाले, प्रवीण तायडे यांनी सभागृहातील महिला सदस्यांचा आदर राखणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी अपशब्दाचा प्रयोग केला. त्यांचा जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व काँग्रेस सदस्य तीव्र निषेध करीत आहेत. तायडे यांनी केलेल्या प्रमादाबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर सभागृहाकडून कायदेशीर कारवाईचा विचार होईल, असे ते म्हणाले. मेळघाटातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून जिल्हा परिषद पदाधिकारी पैसे घेत असल्याचा तायडे जो आरोप केला, त्याचा निषेध मेळघाटातील सदस्य दयाराम काळे, वासंती मंगरोळे सविता काळे, वनिता पाल यांनी निषेध केला. आम्ही दोषींना धडा शिकवूृ, तायडे यांनी पुरावे द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. पत्रपरिषदेला सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, प्रियंका दगडकर, सुरेश निमकर उपस्थित होते.
युवक कॉग्रेसची जिल्हा परिषदेत नारेबाजी
आमसभेतील प्रकाराबाबत माहिती मिळताच युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा परिषदेत धडकलेत. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, परीक्षित जगताप, राहुल येवले, यशवंत काळे, समीर जवंजाळ आदींनी भाजपचे प्रवीण तायडे यांचा निषेध नोंदवित नारेबाजी केली.
प्रवीण तायडेविरूद्ध अॅट्रॉसीटीचा गुन्हा
सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी गाडगेनगर ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविली. अनिता मेश्राम यांच्या तक्रारीवरून प्रवीण तायडेंविरूद्ध अॅक्ट्रॉसीटी तसेच कलम ३५१ नुसार गुन्हा नोंदविला तर तायडे यांच्या तक्रारीवरून मेश्राम यांच्याविरूद्ध कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.