बेलकुंडचे विश्रामगृह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित

By admin | Published: April 24, 2017 12:46 AM2017-04-24T00:46:19+5:302017-04-24T00:46:19+5:30

उच्च न्यायालयाने फटकारल्यावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ऐतिहासिक असे बेलकुंडचे विश्रामगृह अखेर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्याचा ....

Belkund's rest house transferred to Melghat Tiger Reserve | बेलकुंडचे विश्रामगृह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित

बेलकुंडचे विश्रामगृह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित

Next

उच्च न्यायालयाने फटकारले : निसर्ग संरक्षण संस्थेच्या याचिकेचे यश
अमरावती : उच्च न्यायालयाने फटकारल्यावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ऐतिहासिक असे बेलकुंडचे विश्रामगृह अखेर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय १९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला आहे.
निसर्ग संरक्षण संस्थेने महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांबाबत एक याचिका (क्रमांक ३९६०/२००६) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली होती. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान या अतिसंरक्षित (गाभा क्षेत्र) क्षेत्रातील (कोअर एरिया) बेलकुंड विश्रामगृहाच्या ताब्याबद्दलचा मुद्दा उचलण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार हे विश्रामगृह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या वर्षीच दिले होते. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत टोलावा टोलवी सुरू ठेवली. न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना २०१६ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने काहीही पावले उचलले नाही. हा मुद्दा २०१७ मध्ये पुन्हा न्यायालयात चर्चेस आला असताना याप्रकरणी होत असलेली दिरंगाई लक्षात घेऊन १६ जानेवारी २०१७ रोजी न्यायालयाने विश्रामगृहाच्या हस्तांतरणाचे स्पष्ट आदेश दिलेत. यावर ए.व्ही. व्यास, सहाय्यक मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांनी पुन्हा १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मंत्रालयातील कार्यासन अधिकाऱ्यास परवानगी मागण्याचे कागदी घोडे चालविले. यावर मागील तब्बल दोन महिने मंत्रालय गप्प राहिले.
मागील आठवड्यात न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्ते निसर्ग संरक्षण संस्थेच्यावतीने अधिकाऱ्यांची ही टाळाटाळ न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यावर न्यायालयाने एक महिन्याच्या आत हे विश्रामगृह हस्तांतरित न झाल्यास न्यायालयाची अवमानना झाल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टपण सांगितले.
न्यायालयाच्या दणक्यानंतर अखेर शासनाने १९ एप्रिल रोजी शासन निर्णय काढून हे विश्रामगृह तडकाफडकी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला. (प्रतिनिधी)

विश्रामगृहाचा इतिहास
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान या अतिसंरक्षित (गाभा क्षेत्र) क्षेत्रातून जाणाऱ्या हरिसाल ते अकोट या रस्त्यावर बेलकुंड विश्रामगृह वसले आहे. ब्रिटिशांनी १८९१ मध्ये वनजमिनीवर हे विश्रामगृह बांधले होते. ब्रिटिश अधिकारी हे विश्रामगृह डाकबंगला म्हणून वापरायचे व या अत्यंत दुर्गम भागात रस्त्याचे जाळे उभारताना या विश्रामगृहाचा विश्रांती करण्याकरिता वापर करीत. सुरुवातीला दगडी भिंती व वरुन गवताचे छत असे या विश्रामगृहाचे स्वरुप होते. नंतरच्या काळात यावर इंग्रजी कवेलू व व्हरांड्यात लोखंडी ग्रील लावण्यात आलञया. विश्रामगृहाच्या बाजूनेच एक नदी वाहते. या नदीवर ब्रिटिशकालीन स्थापत्य शास्त्राचा नमुना ठरलेला १८८६ साली बांधलेला एक पुरातन पूल आहे. १३१ वर्षापूर्वी बांधलेला हा पूल आजही सुस्थितीत आहे. या बेलकुंड पुलावर एक लोखंडी फळी लावली आहे. त्यावर १८८६ आर. डब्ल्यू. स्वीनरटॉम इएसक्यू एमीक इंजिनिअर बाबू देवनाथ साहाई वोरशिर या पूल बनविणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

स्वातंत्र्यानंतर विश्रामगृह
बांधकाम विभागाच्या ताब्यात
स्वातंत्र्यानंतर बेलकुंडचे हे टुमदार विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांच्या पी.आर.बी. वहीमध्ये या विश्रामगृहाची नोंद असून ते ०.६० एकर एवढ्या जागेवर पसरले आहे. २००७ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील व्याघ्र अधिवास (क्रिटीकल टायगर हेबिटेट)ची अधिसूचना निघाल्यानंतर या कोअर क्षेत्रात वन्यजीव कायद्यानुसार वनेतर कामे, किंवा अशा कामासाठी इतर विभागांनी उभारलेल्या वस्तू यावरील इतर सर्व अधिकार संपुष्टात आले. त्यातच खानसामा, चौकीदार आणि कक्ष सेवक ही पदे रिक्त असल्याने या हे विश्रामगृह गेल्या काही वर्षांपासून अगगळीत पडले होते. त्यामुळे या विश्रामगृहाची दारे, खिडक्या तोडली गेली व छतालासुद्धा भोके पडली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात असल्याने येथे पर्यटकांना येण्यास मनाई आहे, तरीही या विश्रामगृहाची शासनाच्या अनास्थेमुळे अशी दुर्दशा झाली. शासन निर्णयानुसार येत्या काही दिवसात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित होताच मेळघाटच्या ब्रिटिशकालीन इतिहासाचे साक्षीदार राहिलेल्या या विश्रामगृहाचा कायापालट होईल, अशी अपेक्षा आहे, असे मत याचिकाकर्ते वन्यजीव प्रेमी किशोर रिठे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Belkund's rest house transferred to Melghat Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.