आजपासून ग्रामीण भागातील ३३७ शाळांची वाजणार घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:24+5:302021-07-15T04:11:24+5:30
अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील ७४८ पैकी ३३७ शाळांची घंटा गुरुवार १५ जुलैपासून वाजणार आहे. ...
अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील ७४८ पैकी ३३७ शाळांची घंटा गुरुवार १५ जुलैपासून वाजणार आहे. यासंदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्थानिक स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात संबंधिताना दिल्या आहेत.
कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षापासून या शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊन नुकसानही होत आहे. आता कोराेनाची साथ कमी झाल्याने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत होती. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबतही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतची कारवाई सुरू केली होती. ज्या गावात गत महिनाभरापासून एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. अशा गावात या शाळा सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्तरावर गठित करण्यात आलेल्या समितीने शाळा सुरू करण्याबाबत ठराव घेतला आहे. अशा ग्रामीण भागातील ३३७ गावात शाळांची घंटा वाजणार आहे. यामुळे गत दीड वर्षापासून घरीच असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य पसरणार आहे.
बॉक़्स
अशा आहेत सूचना
शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावले द्यावे केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
बॉक्स
मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक
एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बेंचवर सहा फुटाऱ्या अंतराने, एका वर्गात कमाल १५ ते २० विद्यार्थी असावे, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवून लगेच कोरोना चाचणी करून घेणे, संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात असावी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याबाबत दक्षता घ्यावी, शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.