बेलोरा विमानतळ विकासाच्या निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:53 AM2018-03-20T00:53:17+5:302018-03-20T00:53:17+5:30
बहुप्रतीक्षेनंतर बेलोरा विमानतळाचे प्रस्तावित विस्तारीकरणासह विविध विकासकामांच्या निविदा थेट मंत्रालयातून निघाल्या आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : बहुप्रतीक्षेनंतर बेलोरा विमानतळाचे प्रस्तावित विस्तारीकरणासह विविध विकासकामांच्या निविदा थेट मंत्रालयातून निघाल्या आहेत. यात एकूण सहा एजन्सी विकासकामे घेण्यासाठी इच्छुक असून, सुमारे आठ कोटी रुपयांतून टर्मिनल इमारत, एटीएस टॉवर उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याअनुषंगाने एक चमू नुकतीच विमानतळाची पाहणी करून गेली, हे विशेष.
बेलोरा विमानतळाच्या विकासात अडसर ठरणारा जमिनीवरील अडथळ्यांचा अभ्यास (ओएलएस) नुकतेच आटोपला. ओएलएस सर्वेक्षणाद्वारा धावपट्टीवरून ४ ते १५ किमीपर्यंत अडथळे कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. त्यामुळे विमानतळाचा विकासात अडसर ठरणारे पहिले पाऊल दूर झाले आहे.
पुणे- मुंबई विमानसेवेचा प्रस्ताव
बेलोरा विमानतळाहून पुणे, मुंबई अशी दररोज विमानफेरी सुरू करण्याच्या प्रस्ताव इंडिगो, स्पाईस जेटने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविला आहे. अमरावती, पुणे, मुंबई विमानाने प्रवास करण्याऱ्यांची संख्या अधिक असल्याचे विमान कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने टर्मिनल इमारत, एटीएस टॉवर निर्मितीसाठी निविदा काढल्या आहेत. मुंबई, दिल्ली, बंगळुरूसह नागपूर येथील काही एजन्सींनी विकासकामे घेण्यासाठी निविदांमध्ये सहभाग घेतला आहे. विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. धावपट्टीची लांबी वाढविणे, एटीएस टॉवरची निर्मिती, टर्मिनस बिल्डिंग निर्मिती, अग्निशमन यंत्रणा उभारणे, विश्रामकक्ष आदींचा समावेश असणार आहे. टर्मिनल इमारत, एटीएस टॉवर निर्मितीसाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने त्यानुसार शासनाने निविदाप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. एकूण सहा एजन्सींकडून निविदा प्राप्त झाल्या असून, आर्थिक बाबींची पूर्तता तपासल्यानंतर सर्वाधिक कमी किमतीच्या निविदा असलेल्या एजन्सीला कामे सोपविली जातील, अशी माहिती आहे. बेलोरा विमानतळाच्या पूर्णत्वासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख हे प्रयत्नशील आहेत.
विकासकामांच्या निविदा निघाल्याने बेलोरा विमानतळाहून लवकरच विमाने उड्डाण घेतील, यात दुमत नाही. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळाची प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आग्रही आहेत.
- सुनील देशमुख,
आमदार, अमरावती