पेटलेला मिनीट्रक पोहोचला अग्निशमन वाहनांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:04 PM2019-02-02T23:04:16+5:302019-02-02T23:04:42+5:30
आगीचे लोळ उठले असताना ट्रक अग्निशमन वाहनापर्यंत नेण्याचा आगळावेगळा प्रकार शहरात पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे स्थानक चौकात पेटलेला मिनीट्रक चालकाने इर्विन चौकापर्यंत आलेल्या अग्निशमन वाहनांपर्यंत नेला. या प्रकाराने नागरिक अचंबित झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आगीचे लोळ उठले असताना ट्रक अग्निशमन वाहनापर्यंत नेण्याचा आगळावेगळा प्रकार शहरात पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे स्थानक चौकात पेटलेला मिनीट्रक चालकाने इर्विन चौकापर्यंत आलेल्या अग्निशमन वाहनांपर्यंत नेला. या प्रकाराने नागरिक अचंबित झाले होते.
रेल्वेस्थानक चौकातून इर्विनकडे शुक्रवारी रात्री ११.५० वाजताच्या सुमारास येणाऱ्या एका मिनीट्रकवरील ताडपत्रीने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती प्रियंका गौतम यांनी अग्निशमनला दिली. मागील बाजूस आगीचे लोळ उठले असताना भरधाव मिनीट्रक इर्विन चौकाकडे जात होता. अग्निशमन बंबही इर्विन चौकात पोहोचला. कर्मचाºयांनी अवघ्या दहा मिनीटांत आगीवर नियंत्रण मिळविले. पेटलेला मिनीट्रक चालवत नेऊन अग्निशमनच्या वाहनांपर्यत नेण्याची बाब जिवावर बेतू शकली असती. गेल्या तीन दिवसांत शहरात तीन मिनीट्रक जळाले. या आगी कशाने लागल्या, हे अद्याप उघड झालेले नाही.
विलासनगर रोडवर ट्रकमधील कापसाला आग
रेल्वे स्थानक चौकातील आगीच्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात विलासनगरातील गल्ली क्रमांक ५ समोर एमएच २० सीटी-३१७७ क्रमांकाच्या ट्रकमधील कापसाला आग लागली. अग्निशमनचे प्रभारी अधीक्षक सैयद अनवर यांच्या नेतृत्वात पथक पाण्याचे बंब घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले.