चिमुकल्यांनी लोकवर्गणीतून बस स्टँडवर बसविले बेंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:52 PM2018-06-18T23:52:31+5:302018-06-18T23:52:47+5:30
त्यांच्याकडून काय होणार... अशी हेटाळणी लहानग्यांना कोणत्याही कामासाठी मिळत असते. तथापि, चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील चिमुकल्यांनी लोकवर्गणी केली आणि बस स्टँडवर बेंच लावण्याची किमया केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : त्यांच्याकडून काय होणार... अशी हेटाळणी लहानग्यांना कोणत्याही कामासाठी मिळत असते. तथापि, चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील चिमुकल्यांनी लोकवर्गणी केली आणि बस स्टँडवर बेंच लावण्याची किमया केली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथे उन्हाळ्यात राष्ट्रसंत चौकातील मानवता मंदिरात पाच दिवसीय बाल सुसंस्कार शिबिर उत्साहात झाले होते. प्रशिक्षक प्रकाश चवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यादरम्यान लोकवर्गणीतून बस स्टॉपवर बेंच लावण्याचे चिमुकल्यांनी ठरविले. त्यांनी गावातून झोळी फिरविली. यातून आलेल्या पैशांतून दोन बेंच खरेदी करून बस स्टँडवर बसविले. विशेष म्हणजे, पं.स. सभापती याच गावातील आहेत.
बेंचमुळे बसच्या प्रतीक्षेत उभे राहणाऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. या चिमुकल्यांच्या कोणत्याही उपक्रमामागे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चवाळे खंबीरपणे उभे राहतात. याप्रसंगी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार चिमुकल्यांनी केला. संचालन पूजा गोळे व अंतरा चवाळे यांनी केले. आभार दादाराव स्वर्गे यांनी मानले. यावेळी विजया चवाळे, नलिनी गोळे, प्रकाश चवाळे, शोभा हारगुडे, नीता मस्के, विजय वासनिक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जवानाच्या वडिलांच्या हस्ते लोकार्पण
बेंचचा लोकार्पण सोहळा शनिवारी थाटात पार पडला. अध्यक्षस्थानी अनिल देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ मोहोड, रामूजी गाईचारे, शरद गोळे, गाढवे आदींची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात गावातील युवक अश्विन गुल्हाने हे सैन्यात गेल्याबद्दल त्यांच्या वडिलाचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बेंचचे लोकार्पणसुद्धा त्यांच्याच हस्ते झाले.
बसची वाट पाहत माणसे कुठेही उभी राहू शकतात. परंतु, मुली-महिला कुठेही उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही बेंच लावण्याचे ठरविले. गावात झोळी फिरवून प्रत्येकाकडून फूल न फुलाची पाकळी घेतली.
-परणिका महाजन
गावात सुसंस्कार शिबिरामधून आम्ही गावातील समस्यासुद्धा मांडल्या होत्या. आमच्या लक्षात आले की, शाळेत जातेवेळी बस स्टँडवर बसण्यासाठी आम्हाला व प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसते. तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून बेंच बसविले.
- अंतरा चवाळे