मृत शिक्षकांना ठेव संलग्न विमा योजनेचा लाभ दया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:48+5:302021-09-16T04:16:48+5:30
अमरावती : शासकीय, निमशासकीय कर्मचारी सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाल्यास संबंधीताच्या भविष्य निर्वाह निधी योजनेत मृत्यू दिनांकालगत ३६ महिन्यात ...
अमरावती : शासकीय, निमशासकीय कर्मचारी सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाल्यास संबंधीताच्या भविष्य निर्वाह निधी योजनेत मृत्यू दिनांकालगत ३६ महिन्यात जमा झालेल्या भविष्य निर्वाह निधी वर्गणीच्या प्रमाणात मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारास ६० हजार रुपयाच्या कमाल मर्यादित ठेव संलग्न विमा योजना अनुज्ञेय आहे. त्याचा लाभ जिल्हा परिषदमधील मृत झालेल्या शिक्षकांच्या वारसाला देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, शिक्षणाधिकारी एजाज खान यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, सेवेत असताना मृत्यू झालेल्या शिक्षकांबाबत सदर योजना कार्यान्वित नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे, असा आरोप शिक्षक समितीने केला आहे. मागील दीड वर्षात कोविड व अन्य कारणाने अनेक शिक्षक सेवेत असताना मृत्यू पावले आहेत. सेवेत असताना यापूर्वी मागील तीन-चार वर्षात मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.
नियमानुसार, आवश्यक कार्यवाहीचे निर्देश सर्व संबंधितांना द्यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, संभाजी रेवाळे मनीष काळे, राजेश सावरकर, महिला सरीता काठोळे, योगिता जिरापुरे, सुषमा वानखडे, भावना ठाकरे, प्रवीणा कोल्हे यांनी केली आहे.