विमाधारक नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ
By admin | Published: April 20, 2016 12:24 AM2016-04-20T00:24:56+5:302016-04-20T00:24:56+5:30
जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला आहे, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.
शासन आदेशाची प्रतीक्षा : पिकांच्या नुकसानीसाठी मिळणार निम्मी रक्कम
अमरावती : जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला आहे, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांचा विमा काढला नाही, अशाही शेतकऱ्यांना विमा रकमेचा ५० टक्के रक्कम मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ऐन खरिपाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख २९ हजार २१४ हेक्टरवर सोयाबीन व १ लाख ८६ हजार ६६५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. अशी एकूण ५ लाख १५ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यापैकी ६० ते ७० टक्के क्षेत्राचा विमा काढण्यात आला म्हणजेच तीन लाख हेक्टर सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र विमा संरक्षित आहे. या क्षेत्रासह उर्वरित २ लाख हेक्टर विमा न काढलेल्या क्षेत्रालादेखील या शासन योजनेचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २ मार्च २०१६ रोजी शासनाने हा निर्णय घेतला. मात्र यासाठी अजूनही मंडळनिहाय पीक विमा न काढलेले क्षेत्राच्या नोंदी घेण्याचे काम सुरू झालेले नाही. महसूल व कृषी विभागाला अद्याप याविषयीचे आदेश प्राप्त नाही.
शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील क्षेत्र आणि पिकांची नोंद ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पिकांची ५० टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे. जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतही रक्कम मिळणार आहे.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात पेरणी काळात अत्यल्प पाऊस व नंतर दीर्घकाळ पावसाची दडी यामुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांना क्विंटलऐवजी किलोची झडती आली. जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीची वाढ खुंटली व लाल्याचा प्रादुर्भाव यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट झाली. उत्पादन खर्च अधिक वाढल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी ऐच्छिक स्वरुपाचा विमा काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. तसेच पीक कर्जदार शेतकरी सभासदांसाठी पीक विमा योजना सक्तीची असल्याने त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)
अशी मिळणार मदत
कापसाच्या नुकसान भरपाईपोटी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ११ हजार रुपये व विमा न काढलेल्या शेतकऱ्यांच्या निम्मे म्हणजे साडेपाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप पेरणीच्या पूर्व शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
असा आहे २ मार्चचा शासन निर्णय
अमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन व कापूस पिकांसाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक योजनेनुसार मदत देण्यात येईल व ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के शासनाकडून देण्यात येईल.