कर्मचाऱ्यांच्या पश्चात पालकांनाही मिळणार निवृत्ती वेतनाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2016 12:06 AM2016-03-06T00:06:09+5:302016-03-06T00:06:09+5:30
शासनाच्या वित्त विभागाने कुटुंब या संज्ञेचा विस्तार केला आहे.
कुटुंब संज्ञेचा विस्तार : महिलांना पुनर्विवाहानंतरही पेन्शन
अमरावती : शासनाच्या वित्त विभागाने कुटुंब या संज्ञेचा विस्तार केला आहे. यात एकट्या असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पालकाचाही समावेश केल्यामुळे सवेत किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यावर किंवा तिच्यावर अवलंबून असणाऱ्या पालकांनाही आता निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांच्या आई, वडिलांना किंवा त्याच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही सदस्यांना पेन्शन मिळत नव्हती. मात्र या निर्णयामुळे जिल्हा परिषदेपासून ते मंत्रालय स्तरावरील सर्वच शासकीय परंतु एकट्या कर्मचाऱ्यांना आई-वडिलांचे काय होणार, याची चिंंता राहणार नाही. या योजनेअंतर्गत एकट्या शासकीय कर्मचाऱ्यांना आई-वडिलांना हयात असेपर्यंत पेन्शन मिळणार आहे.
महिला कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना तिचे समाजातील स्थान कायम राहील, तिच्या हक्काची जपणूक होईल.तिचे आर्थिक स्वावलंबनाचे मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल.
या दृष्टीने शासनाने विधवांना पुनर्विवाहानंतरही पेन्शन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ नुसार विधवा महिलांनी पुनर्विवाह केल्यास त्यांना त्यांच्या दिवंगत पतीच्या शासकीय सेवेचा लाभ घेता येत नव्हता. परंतु ११ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार विधवा महिला जर आयुष्यात पुन्हा उभी राहू इच्छित असेल तर या विधवा महिलांना पुनर्विवाह केल्यानंतरही तिची पेंशन सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)
पाल्याच्या पश्चात् मिळणार निवृत्ती वेतन
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ अंतर्गत सेवेत असतांना अथवा सेवानिवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास चरितार्थाचे साधन नसल्याने एकट्या असलेल्या त्याच्या किंवा तिच्यावर अवलंबून असलेल्या पालक किंवा कुटुंबातील सदस्य निवृत्ती वेतनास पात्र धरल्या जात नसे, परंतु सामाजिक सुरक्षेचा विचार करून या नियमात बदल करत राज्य शासनाने मुलगा अथवा मुलगी असा भेद न करता एकट्या शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंब अस्तित्वात नसेल आणि पालक पूर्णत: आपल्या पाल्यावर अवलंबून असतील तर त्यांना पाल्याच्या पश्चात कुटुंब निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय २२ जानेवारी २०१५ ला शासनाने घेतला आहे.
अविवाहित महिला कर्मचाऱ्यांना प्रवास सवलतीचा लाभ
शासकीय कर्मचारी,अधिकाऱ्यांना स्वग्राम आणि महाराष्ट्र दर्शन रजा मंजूर आहे. यात अविवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना या सवलतीचा लाभ मिळत नव्हता. या नियमातही आता बदल करण्यात आला आहे. अविवाहित महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणारे आई-वडील, बहीण व भाऊ यांनादेखील या प्रवास सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे.