लोकाभिमुख प्रशासनामुळे योजनांचा लाभ गरजूंपर्यंत

By admin | Published: September 8, 2015 12:14 AM2015-09-08T00:14:58+5:302015-09-08T00:14:58+5:30

शासकीय अधिकारी व कर्मचारी मनापासून काम करीत आहेत. परिणामी प्रशासन लोकाभिमुख झाले असून विविध योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहेत,..

The benefits of schemes to the needs of the people-oriented administration | लोकाभिमुख प्रशासनामुळे योजनांचा लाभ गरजूंपर्यंत

लोकाभिमुख प्रशासनामुळे योजनांचा लाभ गरजूंपर्यंत

Next

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : अचलपूर येथे समाधान शिबिर, प्रमाणपत्रांचे वितरण
अमरावती : शासकीय अधिकारी व कर्मचारी मनापासून काम करीत आहेत. परिणामी प्रशासन लोकाभिमुख झाले असून विविध योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी अचलपूर येथे केले.
महाराजस्व अभियान अंतर्गत अचलपूर येथे कल्याण मंडळ सभागृहात आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर अध्यक्षस्थानी होते. अचलपूरचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी, पंचायत समितीच्या सभापती सोनाली देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनांचा लाभ महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराद्वारे एकाच छत्राखाली दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न निकाली निघत आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान लोकसहभागामुळे यशस्वी झाले आहे. सुमारे २४२ टीएमसी जलसाठा जलशिवारव्दारे उपलब्ध झाला असून त्याचा फायदा साडेदहा हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी होणार आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांची त्यांनी संबंधितांकडून माहिती घेऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
शिबिरानिमित्त वन, कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, पालकमंत्र्यांचा जनसंपर्क कक्ष आदी स्टॉल उभारण्यात आले होते. पालकमंत्र्यांच्या जनता टेली सचिवालयाचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरानिमित्त लाभार्थींना विविध योजनांच्या धनादेशांचे व जात प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समाधान शिबिरामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांचे प्रश्न सुटत आहेत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष नंदवंशी यांनी केले. अचलपूर तालुक्याचा परिसर संत्रा आणि सोयाबिन उत्पादकांचा आहे. त्यामुळे या भागात प्रक्रिया उद्योग उभे झाले पाहिजेत, अशी विनंती नंदवंशी यांनी पालकमंत्र्यांना केली.
अध्यक्षीय मार्गदर्शन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी केले. विद्यार्थ्यांसह प्रत्येक नागरिकांनी शासनाच्या योजनेचे लाभ घेण्यासाठी आधारकार्डची नोंदणी करावी. शासनाने आता सेवा हमी कायदा लागू केला आहे. या माध्यमातून विहित कालावधीमध्ये नागरिकांचे प्रश्न सुटणार आहेत. लाभार्थींना अन्नसुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व इतर योजनांचे लाभ चांगल्या प्रकारे दिले जात आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली.
शासनाच्या विविध विभागांच्या योजना सर्वसामन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंडळ स्तरावर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.
अचलपूर विभागातील तहसील महाआॅनलाईन कार्यक्रमांतर्गत आॅनलाईन झाल्यात. शेतकऱ्यांना सातबारा, जातप्रमाणपत्र, विद्यार्थी, नागरिकांना इतर प्रमाणपत्रे संबंधितांना तात्काळ उपलब्ध करून दिली जात आहेत. शेतकऱ्यांच्या योगदानामुळे १३६ पाणंद रस्ते तयार करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के यांनी प्रास्ताविकात दिली. संचालन अनिरूध्द पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The benefits of schemes to the needs of the people-oriented administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.