जिल्ह्यात सर्वोत्तम विकासकामे
By admin | Published: January 10, 2015 10:47 PM2015-01-10T22:47:08+5:302015-01-10T22:47:08+5:30
अमरावती जिल्हा व विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकास कामे करण्यास तत्पर आहे. त्यांची कामाची आवड व तयारी लक्षात घेता आगामी काळात अमरावती जिल्ह्यात
अमरावती : अमरावती जिल्हा व विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकास कामे करण्यास तत्पर आहे. त्यांची कामाची आवड व तयारी लक्षात घेता आगामी काळात अमरावती जिल्ह्यात सर्वोत्तम विकास कामे होतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.
ना.पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, प्रकल्प अधिकारी संजय मीना, जिल्हा नियोजन अधिकारी काळे अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
ना.पोटे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा गौरव केला. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला गाव मुक्काम कार्यक्रम प्रशंसनीय आहे. सन २०१४-१५ या वषार्तील खरीप हंगामा १९८१ गावात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शासनाकडून ३०२ कोटी रुपये दुष्काळ निधी मंजूर झाला. त्यापैकी १२५ कोटी रुपयांचे वाटप गाव पातळीवर होणार आहे. त्याचा शुभारंभ रविवार ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता चांदुर रेल्वे तालुक्यातील धनोडी येथे चावडी वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक हिताची बांधकामे तातडीने पूर्ण करावीत. विद्युत विभागाने बंद ट्रान्सफार्मर तातडीने दुरुस्त करावेत, शेतकऱ्यांची कोणतीही अडचण वा तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी जादा ट्रान्सफार्मर ठेवावेत. उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी पाच लक्ष ते पाच कोटी गुंतवणुकीच्या उद्योगांची यादी तयार करुन त्यातील उद्योगांच्या संधी तसेच उत्पादनाचा तपशील बेरोजगार युवकांच्या माहितीसाठी दर्शनीय भागात ठेवावा. योजनांची माहिती बेरोजगारांना तत्परतेने देण्यात यावी. आपणास सर्वांना घेऊन ग्राम पातळीपर्यंत शासनाच्या विकास योजना घेऊन जावयाच्या आहेत.
उद्योगात महिलांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिने उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. शहर सौंदर्यीकरणाच्या कामे जे लोक किंवा स्वयंसेवी संस्था इच्छूक असतील त्यांना निमंत्रित करुन नियोजन करावे, सध्या टंचाई परिस्थिती असून सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांनी अंगणवाडी बांधकाम, रस्त्यांची पूर्ण झालेली व प्रगतीपथावरील कामे, सामूहिक विवाह, वैयक्तिक लाभाच्या योजना, ग्रामीण भागातील वाहतूक सुधारणा, नाला खोलीकरण, नदी खोलीकरणाची कामे, जलसंवर्धनासाठी बांधकाम परवानगी देताना रेन हार्वेस्टिंग सक्तीचे करणे, आदी कामांचा तपशीलवार आढावा घेऊन मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)