सुपारी तस्करीचे अमरावती कनेक्शन; चार जण ईडीच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 10:43 AM2022-12-06T10:43:50+5:302022-12-06T10:49:43+5:30
नागपूरचा अजय कामनानी मुख्य सूत्रधार, जून महिन्यात झाली होती तक्रार
अमरावती : सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सुपारी तस्करांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअनुषंगाने अमरावती येथे चार जण ईडीच्या रडारवर असून, सुपारी व्यापाऱ्यांचे सर्चिंगसुद्धा करण्यात आले आहे. गुटखा तथा सुपारी तस्कर विक्की मंगलानी याच्या अपसंपदेबाबत ईडीकडे तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर त्या दिशेने तपासाची सूत्रे हलविली जात आहेत.
ईडीने गत काही दिवसांपासून सुपारी तस्करांची पाळेमुळे निखंदून काढण्यासाठी धाडसत्र राबविले आहे. ईडीच्या कारवाईतून अमरावती तूर्तास दोन हात दूर होते. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे गुटखाप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला अहेफाज मेमन याने पोलीस जबाबात गुटखा तस्कर हा विक्रम उर्फ विक्की सच्चानंद मंगलानी (रा. अमरावती) असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार सोनेगाव आणि बाभूळगाव पोलिसांनी विक्कीला नागपूर विमानतळावरून पळून जात असताना मोठ्या शिताफीने शनिवारी अटक केली. त्यामुळे ईडीने आता सुपारी तथा गुटखा तस्कर विक्की मंगलानी याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
विक्कीचे प्रतिष्ठान, निवासस्थान, विविध ठिकाणच्या गोडाऊनचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सर्चिंग केले आहे. एवढेच नव्हे तर विक्कीशी व्यावसायिक संबंध ठेवणारे व्यापारी, मित्रांचीदेखील माहिती ईडीने गोळा केली आहे. विक्कीचा सुपारी तस्करीतनागपूर येथील अजय कामनानी हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. सुपारी तस्करीप्रकरणी विक्कीसह चार जण ईडीच्या रडारवर असल्याच्या चर्चांनी अमरावतीच्या बाजारपेठेत सोमवारी एकच खळबळ उडाली आहे.
विक्कीच्या १३० कोटींच्या अपसंपदेची तक्रार
विक्की मंगलानी याने गुटखा तस्करीतून १३० कोटी रुपयांची अपसंपदा जमविल्याची तक्रार नागपूर येथील सक्तवसुली संचालनालयाकडे सहा महिन्यांपूर्वी देण्यात आली आहे. या तक्रारीसोबत शेतीचे सातबारा, भूखंड, फ्लॅटची कागदपत्रे ईडीकडे सोपविली आहेत. तसेच बडनेरा मार्गावर एका जागेचा व्यवहार झाला असून केवळ खरेदी होणे बाकी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर विक्कीची कोणकोणत्या बँकेत खाती आहेत, याविषयी माहिती देण्यात आली आहे.