सोफियाकडून विश्वासघात, शेतकरी देशोधडीला
By admin | Published: March 28, 2016 12:02 AM2016-03-28T00:02:20+5:302016-03-28T00:02:20+5:30
जिल्ह्यातील ५८ हजार एकर सिंचनाचे पाणी बेमालुमपणे पळविणाऱ्या ‘सोफिया’च्या व्यवस्थापनाचा ‘बनेलपणा’ आता ग्रामस्थांना पदोपदी जाणवू लागला आहे.
जमीन कसायची कशी ? : वाघोली-माहुली ग्रामस्थांचा सवाल
प्रदीप भाकरे अमरावती
जिल्ह्यातील ५८ हजार एकर सिंचनाचे पाणी बेमालुमपणे पळविणाऱ्या ‘सोफिया’च्या व्यवस्थापनाचा ‘बनेलपणा’ आता ग्रामस्थांना पदोपदी जाणवू लागला आहे. सामाजिक बांधिलकीचा भंपक दावा करणाऱ्या सोफियाच्या विश्वासघातामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. हक्काच्या जमिनीचे सोफियामुळे दोन फाड झालेत. आता ही जमीन कसायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ‘आ’वासून उभा आहे. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमध्ये वाघोलीजवळ सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्प आकारास आला. हळूहळू याचे दुष्परिणाम ग्रामस्थांना जाणवू लागले असून आता करायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण झालाय.
रेल्वे ट्रॅकमुळे शेती विभागली
अमरावती : सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला कोळसा पुरविण्यासाठी वाघोली ते वलगाव रेल्वे ट्रॅक बनविण्यात आला. प्रकल्पस्थळापासून ट्रॅकच्या सभोवतालची जमीन संपादित करण्यात आली. मात्र, ज्यांची शेती या रेल्वे ट्रॅकने विभागली गेली त्यांची मोठी ससेहोलपट झाली आहे. या ट्रॅकमुळे अलीकडच्या शेतीत तब्बल ३ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे शेतजमीन कसायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
वहिवाटीचा रस्ता बंद
रेल्वेगेट आणि ट्रॅकला चहुबाजूने काटेरी कुंपण घालण्यात आल्याने रस्ता बंद झाला आहे. फेन्सिंग टाकल्याने पलीकडच्या शेतीत या शेतकऱ्यांना पायदळदेखील जाता येत नाही. अगदी गावानजीक असलेल्या शेतशिवारात वाघोली ते माहुली किंवा अन्य मार्गाने तीन किलोमीटरचा वळसा घालून जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बैलजोडी, ट्रॅक्टर शेतापर्यंत पोहोचत नाहीत. तूर असो वा कापूस डोक्यावरून वाहून आणावा लागतो.
१०० एकर शेत बाधित
सोफियाच्या रेल्वे ट्रॅकच्या अलीकडे आणि पलीकडे वाघोली आणि माहुली जहांगीर येथील ग्रामस्थांची १०० एकरपेक्षा अधिक जमीन आहे. ही जमीन रेल्वे ट्रॅकमुळे विभागले गेल्याने ‘सब-वे’ मध्ये पाणी भरल्याने ही जमीन कशी करायची, असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’कडे उपस्थित केला.
सोफिया रेल्वे ट्रॅकपलीकडे सहा एकर ओलिताची शेती आहे. कुंपण भिंतीचा अडसर आणि ‘सब-वे’ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेती करायची अशी, हा प्रश्नच असून तीन किलोमीटरचा वळसा घेऊनही शेतापर्यंत बैलगाडी पोहोचत नाही.
- सुधाकर हरडे,
शेतकरी, वाघोली
‘सब-वे’ गेला पाण्यात
वाघोली ग्रामस्थांना त्यांच्या शेतात जाता यावे, यासाठी रेल्वे ट्रॅकखालून ‘सब-वे’ बनविण्यात आला. मात्र, या रस्त्याची १० ते १२ फुटाची खोली लक्षात घेता बैलबंडी वा अन्य वाहतूक कशी होणार होती, हा संशोधनाचा विषय होता. मात्र, तत्पूर्वी या ‘सब-वे’मध्ये तूर्तास ८ ते १० फूट पाणी साचल्याने हा मार्ग शेतकऱ्यांसाठी बंद आहे. वाघोली येथील रामू खंडारे आणि शुभम राठोड या तरुणांनी धाडस करुन पाण्याची खोली दाखविली. सोफिया प्रकल्पातून बाहेर पडणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या या ‘सब-वे’ मध्ये साचल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. उगाच या ‘सब-वे’ चे ढोंग कशाला रचले? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.