खबरदार! जंगलात पार्ट्या कराल तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:28 PM2019-05-06T23:28:50+5:302019-05-06T23:29:17+5:30
वडाळी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात पार्ट्या कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाईला समोर जावे लागणार आहे. जंगलात मानवी हस्तक्षेप पर्यावरण दूषित करणाऱ्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे जंगलात ओली पार्टी करणाऱ्या उपद्रवींवर अंकुश लावण्यासाठी अमरावती वनविभागाने जंगल परिसरात ठिकठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना इशारा दिला आहे.
अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात पार्ट्या कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाईला समोर जावे लागणार आहे. जंगलात मानवी हस्तक्षेप पर्यावरण दूषित करणाऱ्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे जंगलात ओली पार्टी करणाऱ्या उपद्रवींवर अंकुश लावण्यासाठी अमरावती वनविभागाने जंगल परिसरात ठिकठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना इशारा दिला आहे.
वडाळी वनपरिक्षेत्राचा दर्जा राखीव वनात असून, हे जंगल वन्यजीवाचे आश्रयस्थान आहे. या जंगलात बिबट, रानडुक्कर, नीलगाय, चितळ, मोर आदी वन्यजीवांसह जंगलाचा राजा वाघसुद्धा आढळून आला आहे. त्यामुळे जंगलात मानवी हस्तक्षेप धोकादायक ठरू शकते. मानव व वन्यप्राणी संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत वडाळी वनपरिक्षेत्रात छत्री तलाव मार्गावरील जंगलात मद्यपी पार्ट्या करताना आढळले. पार्ट्या करणारे जंगलात कचरा व घाण करून ठेवत असल्यामुळे वन्यजीवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जंगलातील काही ठिकाणी मद्याच्या बॉटल्स व पाणी पाऊच आढळल्याचे काही प्रकार पुढे आले. याविषयी गंभीर दखल घेत उपवनसरंक्षक गजेन्द्र नरवणे यांनी घेतली. विनापरवानगी जंगलात जाल, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे.
- तर होईल दखलपात्र वनगुन्हा
विनापरवानगी जंगलात फिरायला जाणे, पार्टी करणे, आगी लावणे, धूम्रपान अथवा मद्यपान करणे, वृक्षतोड करणे, वन्यजीवाला त्रास व ईजा होईल, असे कोणतेही कृत्य दखलपात्र वनगुन्हा ठरते. जर वनविभागाने दिलेल्या सूचनांचे कोणी उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ चे विविध कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
छत्री तलाव मार्गालगतच्या जंगलात मद्यपींच्या पार्ट्या चालत असल्याचा प्रकार तेथील मद्याच्या बॉटलवरून लक्षात येत आहे. जंगलात पार्ट्या करणे गुन्हा ठरतो. त्याचा परिणाम वन्यजीवांवर होतो. त्यामुळे सूचना फलक लावून कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहे.
- गजेंद्र नरवणे, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग