सावधान, 'फेक न्यूज', आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ शेअर कराल तर..!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 01:17 PM2024-10-19T13:17:41+5:302024-10-19T13:18:44+5:30
Amravati : सोशल मॉनिटरिंग सेलचा वॉच, सायबर पोलिस २४ बाय ७ सजग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ऑनलाइन तथा सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविणाऱ्या 'फेक न्यूज', फेक पोस्ट व जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांवर सायबर पथकाचे विशेष लक्ष राहणार आहे. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुरुवारी प्रसिद्धिमाध्यमांना ही माहिती दिली.
दोन समाजांत तेढ निर्माण होईल, धार्मिक, जातीय भावना दुखावतील अशा पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपुरी गेट पोलिस ठाण्यावर झालेली दगडफेक अशाच फेक व्हिडीओ पोस्टचा परिपाक ठरला. चुकीची माहिती पसरविणाऱ्या 'फेक न्यूज'ही काही जणांकडून पसरविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने ऑनलाइन फेक न्यूज, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणान्यांवर सायबर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.
सायबर पोलिस स्टेशनमधील सोशल मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून देखील फेक न्यूज व सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवले जात आहे. सायबर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे व सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार यांची टीम त्यासाठी कार्यरत आहे.
फेक न्यूजसंदर्भात तक्रार कोठे कराल?
आपत्तीकारक मजकूर किवा फेक न्यूजसंदर्भात तक्रार करायची असेल तर ती स्थानिक पोलिस ठाणे किंवा सायबर पोलिस ठाणे येथे करता येते. यासोबतच डायल ११२ सह निवडणूक प्रशासनाच्या सी-व्हिजिल अॅपवरही फेक न्यूज व आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करता येते.
शहर आयुक्तालयात सोशल मॉनिटरिंग सेल
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात सायबर पोलिस ठाण्यात सोशल मॉनिटरिंग सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. तो सेल सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवून आहे. एक अधिकारी, एक कर्मचारी त्यासाठी २४ तास नेमण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या काळात विशेष लक्ष
निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, कोणत्याही प्रकारचे चुकीचे मेसेज किंवा फेक न्यूज व्हायरल होऊन सामाजिक शांतता भंग होऊ नये, यासाठी सायबर पोलिस स्टेशनचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे एखादी चुकीची बातमी पसरवणे धोक्याचे ठरू शकते.
लोकसभेवेळी आचारसंहितेचे दोन गुन्हे दाखल
अद्याप फेक न्यूज वा सोशल मीडियावरील पोस्टबाबत कुठलीही तक्रार वा गुन्हा दाखल झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवणगाव व स्थानिक ओसवाल भवन येथील दोन कार्यक्रमांच्या अनुषंगाने अनुक्रमे नांदगाव पेठ व राजापेठ पोलिस ठाण्यात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तर फौजदारी कारवाई
"खोटी माहिती पसरवल्यास, फेक न्यूज शेअर केल्यास भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसारसुद्धा कारवाई केली जाते. फेक न्यूज व एकंदरीतच सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सोशल मॉनिटरिंग सेल कार्यान्वित करण्यात आला आहे."
- नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त