Mucomycosis; सावधान, अचलपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 07:00 AM2021-05-23T07:00:00+5:302021-05-23T07:00:02+5:30
Amravati news अचलपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढ होत आहे. परतवाड्यात म्युकरमायकोसिसच्या अतिगंभीर १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अचलपूर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढ होत आहे. परतवाड्यात म्युकरमायकोसिसच्या अतिगंभीर १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात डॉक्टरांना कुणाचा जबडा, कुणाच्या जबड्याचे हाड, कुणाचे दात काढावे लागले आहेत. हिरड्यांनवरही शस्त्रक्रिया करावी लागली आहे. या शस्त्रक्रिया अवघ्या २० ते २५ दिवसातील आहेत.
कोरोनावरील उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तींना हा म्युकरमायकोसिसचा त्रास होत असून अशा रुग्णांवर या शस्त्रक्रिया डॉक्टरांना कराव्या लागल्या आहेत. दात दुखणे, दात हालायला लागणे, हिरड्यांनमधून पू बाहेर येणे, दातांचे दुखणे सहन न न होणे, दात, हाड खराब होणे, डोकं दुखणे ही लक्षणे या रुग्णांनमध्ये आढळून आली आहेत.
बुरशीजन्य असलेल्या म्युकरमायकोसिसच्या आजारत या रुग्णांना च्या मुखात दातांवर जबड्यांत काळ्या रंगाची बुरशी स्पष्टपणे बघायला मिळाली आहे. ही काळी बुरशी त्यांच्या दातांकरिता, जबड्यांकरिता,हिरड्यांकरिता घातक ठरली आहे. यात काहींना डोळ्यांचाही त्रास जाणवत आहे.
म्युकरमायकोसिसच्या त्रासाने ग्रस्त एक डोळ्याचा रुग्ण स्थानिक डोळ्यांच्या डॉक्टरकडे पोहचला. पण नंतर तो त्यांच्या कडे आलाच नाही.म्युकरमायकोसिसने त्रस्त दात,नाक,कान, डोळ्याचे रुग्ण अमरावती, नागपूर कडे उपचारार्थ जात असल्याचे सांगितल्या जात आहे.
अचलपूर तालुक्यासह लगतच्या परिसरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठया प्रमाणात निघत आहेत. ही रुग्ण संख्या जवळपास ५० वर पोहचली आहे. हे सर्व रुग्ण आधी कोरोना ग्रस्त होते. कोरोनावर मात केल्यानंतर यांना म्युकरमायकोसिसने त्यांना ग्रासले आहे.
आधी कोरोनातून बरे झाल्यानंतर दिड ते दोन महिन्यांनी म्युकरमायकोसिसचे रुग्ण दिसायचे. आता मात्र अवघ्या १३ ते १४ दिवसांतच याची लागण होत आहे. कोरोना काळातच त्या रुग्णाना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचे चित्र आहे.
औषधांचा तुटवडा
या म्युकरमायकोसिसच्या रुग्णाना अँफ्मोटेरिसिन बी हे महागडे इंजेक्शन द्यावे लागते. पण या इंजेक्शनचा तुटवडा आहे. वेळेवर हे औषध उपलब्ध होत नाही.
कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णानमध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.साखरेचे प्रमाण अधिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना याची लागण होत आहे.वेळीच औषधोपचार केल्यास हा आजार बरा होतो. म्युकरमायकोसिसने ग्रस्त अतिगंभीर १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्यात.
डॉ. महेश अग्रवाल, दंत व मुख शल्य चिकित्सक, परतवाडा
म्युकरमायकोसिसने ग्रस्त अतिगंभीर रुग्नांना ऍनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया केल्या गेल्यात. यात एका शस्त्रक्रियेला तब्बल दोन ते चार तास लागतात. कोरोना काळातच याची लागण झाल्याचे दिसू येत आहे. औषधोपचाराने हा आजार बरा होतो. या आजारात अँम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनची गरज भासते.
डॉ मीनल डफडे, भूलतज्ञ,परतवाडा