गणेशोत्सवासंदर्भात सोशल पोस्ट टाकताना सावधान, तुम्हावर ‘खाकी’चा वॉच!
By प्रदीप भाकरे | Published: September 21, 2023 12:44 PM2023-09-21T12:44:17+5:302023-09-21T12:46:57+5:30
ग्रामीण पोलीस सज्ज : जिल्ह्यात झाली १२७४ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना
अमरावती : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी सोशल मिडियावरील पोस्टवर सायबर सेलच्या विशेष पथकाद्वारे सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. मिरवणूक व विसर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा, व्हिडीओग्राफी, ड्रोन' कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान डॉल्बी साऊंड सिस्टिम वर बंदी घालण्यात आली असून अशा प्रकारचे साऊंड सिस्टिम मिरवणुकीमध्ये वापरण्यात येऊ नये, याबाबत सर्व मंडळाना लेखी आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्यात १९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत गणपती उत्सव साजरा होत आहे. यादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व गणेशोत्सव आनंदात साजरा होण्याकरीता पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात अमरावती ग्रामीण पोलीस दल सुसज्ज ठेवण्यात आले आहे. अमरावती ग्रामीण घटकात घरगुती गणेश व्यतिरिक्त एकूण १२७४ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना शांततेत व उत्साहात झाली.
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी संवेदनशिल ठिकाणी स्वतः भेटी देवून सुरक्षिततेच्या दृष्टीने मिरवणुकांचे मार्गाची पाहणी केली. तथा विसर्जनादरम्यान येणा-या अडचणींवर चर्चा करुन सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदारांना सूचना देवून सदर उत्सवादरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले.
खबरदार, अन्यथा कारवाई
ज्वलनशिल पदार्थ, शस्त्र, काठ्या, आक्षेपार्ह गाणे वाजवणे, आक्षेपार्ह देखावा प्रदर्शित करणे या बाबीवर निर्बंध घालण्यात आले असून संबंधित सर्व सार्वजनिक मंडळाना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हददीतील सराईत गुन्हेगार, धार्मिक तेढ निर्माण करणारे तथा जातीय दंगलीतील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष देवून त्यांच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
होमगार्ड रवाना
गणेशोत्सवादरम्यान ग्रामीणमध्ये एकूण ७५० होमगार्ड देण्यात असून त्यामध्ये ६०० पुरुष व १५० महिला होमगार्ड पोलीस स्टेशन च्या मागणीनुसार संबंधित सर्व ठाण्यात रवाना झाले. तसेच ग्रामीण घटकातील सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदारांसह ठाण्याचे शासकिय वाहन व डायल ११२ चे वाहन सतत पेट्रोलिंगकरीता लावण्यात आले आहे.
महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट व पेट्रोलिंग करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. जातीय सलोखा अबाधित ठेवूनशांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता समाजात जातीय सलोखा ठेवावा.
- पोलीस अधिक्षक, अविनाश बारगळ