बी.फार्म. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:39 PM2018-07-08T22:39:05+5:302018-07-08T22:39:23+5:30
नियमित व पुरवणी परीक्षेसाठी अन्य विद्यापीठांच्या तुलनेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून अवाजवी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे विभागातील औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्म.) च्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रहार विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात शनिवारी विद्यापीठात मोर्चाद्वारे धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नियमित व पुरवणी परीक्षेसाठी अन्य विद्यापीठांच्या तुलनेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून अवाजवी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे विभागातील औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्म.) च्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रहार विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात शनिवारी विद्यापीठात मोर्चाद्वारे धडक दिली.
नियमित परीक्षेचे शुल्क तब्बल २ हजार २४०, तर पुरवणी परीक्षेचे १ हजार ६४० रुपये आकारण्यात येत आहे. एवढे शुल्क घेऊनही परीक्षेचा निकाल वेळेत लागत नाही. निकालात अनेक त्रुटी आढळून येतात. पुनर्मूल्यांकनाचा निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. जानेवारी महिन्यात शुल्क नियामक प्राधिकर समिती गठित करून चौकशी करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी दिले होते. सदर समितीचे गठण झाले असले तरी याबाबत निर्णय घेण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या संबंधित समित्यांचे गठण झालेले नाही. सप्टेंबरपर्यंत अंतिम निर्णय होऊन पुढील सत्रापासून अंमलबजावणी करण्याची हमी कुलगुरूंनी दिली होती. त्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे उपप्रदेशाध्यक्ष व प्रहार विद्यार्थी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष अक्षय राऊत, अमरावती जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे, ईश्वर राऊत, शुभम वारणकर, दीपक ढाबे, अतुल वाघमारे आदी उपस्थित होते.