विदर्भातील आठ संस्थांना भूदान जमिनीची खिरापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:05 PM2018-07-25T12:05:05+5:302018-07-25T12:07:05+5:30
भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे यांना मिळालेल्या भूदानापैकी २०.८ हेक्टर जमीन भूदान यज्ञ मंडळाने नियमांना बगल देत चक्क विदर्भातील आठ शैक्षणिक संस्थांना बहाल केली.
गजानन मोहोड
अमरावती : भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे यांना मिळालेल्या भूदानापैकी २०.८ हेक्टर जमीन भूदान यज्ञ मंडळाने नियमांना बगल देत चक्क विदर्भातील आठ शैक्षणिक संस्थांना बहाल केली. विशेष म्हणजे, या सर्व संस्था अशासकीय व तत्कालीन अध्यक्षांच्या निकटवर्तीयांच्या असल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रारींना पूर्णत: बेदखल करण्यात आले. महसूलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीदेखील बिनबोभाट नियमबाह्य फेरफार केले.
भूदान यज्ञ अधिनियम १९५३ चे कलम ३ अन्वये शेती कसणाऱ्यां भूमिहीन शेतमजुरास जमीन देण्याची तरतूद असताना, कलम ३३ (अ) चा अन्वयार्थ लावीत सेवाभावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां भूदान यज्ञ मंडळद्वारा नियमांना बगल देण्यात आली. यामध्ये २० मे १९७७ रोजी वर्धा येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाला वर्धा तालुक्यातील जऊळगाव येथील १.६२ हेक्टरचा पट्टा देण्यात आला. याव्यतिरिक्त उर्वरित सातही पट्टे अशासकीय संस्थांना अलीकडच्या चार वर्षांत देण्यात आले. विशेष म्हणजे, यासाठी झालेला विरोध हा दडपशाहीने मोडीत काढण्यात प्रकार या सर्वोदयी अन् सेवाभावी संस्थेत झाला.