भीतीपोटी जीवलग मित्राचा मृतदेह केला दफन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:02 AM2017-07-29T00:02:45+5:302017-07-29T00:04:39+5:30
वीजपुरवठा प्रवाहित करून मासेमारी करताना एकाचा मृत्यू झाला. मात्र सोबतच्या मित्राने भीतीपोटी याची वाच्यता न करता त्याचा मृतदेह जंगलात पुरला.
सूरज डहाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : वीजपुरवठा प्रवाहित करून मासेमारी करताना एकाचा मृत्यू झाला. मात्र सोबतच्या मित्राने भीतीपोटी याची वाच्यता न करता त्याचा मृतदेह जंगलात पुरला. सात दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. शुक्रवारी तिवसा पोलिसांनी वर्धा नदीपात्राच्या अंबिकापूर घाट परिसरात पुरलेला मृतदेह बाहेर काढला.
नागो रामाजी डाहे (२६,रा. तारखेड) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गोपाल रामकृष्ण कुहिटे (२१,रा.तारखेड) या मृताच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, २१ जुलै रोजी मृत नागो व गोपाल दोघेही मासेमारीसाठी गेले होते. वीज प्रवाहित करून मासेमारी करीत असताना विजेच्या धक्क्याने नागोचा मृत्यू झाला. मात्र, याची माहिती कुणालाच न देता परिसरातील जनावराच्या खड्ड्यात त्याचा मृतदेह पुरला. यानंतर तो आपल्या गावी आला. मात्र, याची वाच्यता त्याने कुणाजवळच केली नाही. दरम्यान नागो बेपत्ता झाल्याने त्याबद्दलची विचारपूस सुरू झाली. यासंदर्भात नागोची आई अन्नपूर्णा हिने २५ जुलै रोजी तिवसा पोलिसात तक्रार केली. कसून चौकशी केली असता गोपलाने विजेच्या धक्क्याने नागोचा मृत्यू झाला व भीतीपोटी मृतदेह पुरल्याचे सांगितले. याआधारे तिवसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उखरून काढला. सात दिवस झाल्यामुळे तो कुजला होता. यामुळे घटनास्थळीच विच्छेदनाची प्रक्रिया आटोपून शव मृताच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर कुणासही अटक केलेली नव्हती वा गुन्हा दाखल केलेला नव्हता. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत, तिवसा ठाणेदार सतीश जाधव, कुºहा पोलीस ठाणेदार गोरखनाथ जाधवसह तिवस्याचे नायब तहसीलदार डी.टी.पंढरे उपस्थित होते.
...म्हणून बळावला संशय
नागो बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या मित्रांना विचारपूस करण्यात आली. गोपाललाही विचारण्यात आले. यावर ‘‘मला माहीत नाही, कशानेही मरेल तर माझेच नाव घ्याल का?’’असे उत्तर दिले. यामुळे मृत नागोच्या नातलगांचा संशय बळावला. यानंतर नागो बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. यावर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर गोपाल फुटला व त्याने मृतदेह पुरविल्याचे सांगितले. मृताच्या नातलगांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे.
तणावसदृश स्थिती
तक्रार तिवसा पोलिसांत व घटनास्थळ कुºहा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने दोन्ही ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र घटनेची माहिती मिळताच येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र झाले. दरम्यान मच्छीमारदेखील आल्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला होता. गर्दी पाहता पोलिसांनी घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.