बोर्डी येथील स्मशानात भजन, कीर्तन अन् प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:18 PM2018-03-14T23:18:18+5:302018-03-14T23:18:18+5:30
स्मशानभूमीत मृतदेह जाळला की स्मशान शांतता. गाववेशीवरील एक भीतीदायक ठिकाण, रात्री, दिवसा तेथून जाण्यासाठी घाबरल्यासारखे होणे, मनात भूत आदी विचार. परंतु, अचलपूर तालुक्यातील बोर्डी नावाच्या छोट्याशा खेड्याने या सर्वांवर मात केली आहे.
नरेंद्र जावरे
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : स्मशानभूमीत मृतदेह जाळला की स्मशान शांतता. गाववेशीवरील एक भीतीदायक ठिकाण, रात्री, दिवसा तेथून जाण्यासाठी घाबरल्यासारखे होणे, मनात भूत आदी विचार. परंतु, अचलपूर तालुक्यातील बोर्डी नावाच्या छोट्याशा खेड्याने या सर्वांवर मात केली आहे. येथे श्री संत कबीर स्मशानभूमीत सुविचार फलक, दानपेटी लावण्यासह भजन, कीर्तन, प्रबोधन आणि बुद्धवंदनेसह राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची राष्टÑवंदना म्हटली जात असल्याचा प्रकार स्मशानभूमीत बघून सर्व स्तब्ध झाले.
अचलपूर तालुक्यातील ‘बोर्डी’ ग्रामपंचायत दीड हजांरावर लोकसंख्येचे इवलेसे खेडे, मात्र, गावातील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आणि तेथे एखाद्या देवालयाप्रमाणे होणारे कार्यक्रम अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले.
सर्व समाजाची स्मशानभूमी असल्याने ‘एक देश एक स्मशान’ या तत्त्वावर येथील नागरिक आपसात कुठलाच भेदभाव ठेवीत नाही, मात्र, मुस्लीम बांधव वगळता सर्व समाजाच्या मृतदेहांना अग्नी, दफन केले जाते. मुस्लीम बांधवांनीसुद्धा येथे यावे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश अंबाडकर यांनी सांगितले. १९८७ ला बोर्डी गावात स्मशानभूमी तयार झाली. शासन, नागरिकांसह, लोकप्रतिनिधींनी आर्थिक सहकार्य केले. परंतु स्मशानभूमीबद्दल असलेली मनातील भीती दूर व्हावी, सर्वात शांत ठिकाण म्हणून तेथे सामाजिक कार्यावर संतांचे विचार सांगत, मान्यवरांच्या हस्ते प्रबोधन केले जाते.
स्मशानातील फुलांनी देवपूजा
बोर्डी गावातील स्मशानात दीडशे विविध प्रजातींची झाडे आहेत. पूर्वी स्मशानातील झाडांची फुले घरात नेणे अपशकुन समजल्या जात होते. आता ती अंधश्रद्धा दूर झाली, नागरिक फुलं नेतात, येथे सुविचार फलकावर वेगवेगळे संतांचे विचार लिहिले जातात. छान उद्यान तयार करण्यात आले आहे. बसण्यासाठी सोळा बेंच, झुला आहे. मंदिराप्रमाणे दोन दानपेट्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस पाहता दानपेटीतील रकमेतून स्मशानाचा विकास व पाणेरी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
सत्कार, वाढदिवस, वंदना अन फराळ...: श्री संत कबीर निर्वाणभूमीवर २४ मार्च रोजी नंदू वºहेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात आंतरजातीय विवाह केलेल्या नवदाम्पत्यांचा सत्कार प्रबोधन ठेवण्यात आले आहे. बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरूवात, तर राष्टÑवंदनेने समारोप होणार आहे. मोठ्या संख्येने राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सपत्नीक सत्कार केला जाईल. स्मशानभूमीत जेवणावळी, डबेपार्टी हे नित्याचेच झाले आहे. अंधश्रद्धा दूर व्हावी, स्मशानभूमीबद्दल भीती नष्ट व्हावी, यासाठी सर्व नागरिकांना एकत्र आणून कार्यक्रम घेण्यात येत असल्याने दरवर्षी भक्कम प्रतिसाद लाभत असल्याचे रमेश अंबाडकर म्हणाले. ‘राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत ‘उठो दिसे ते पूर्ण करी। जगाचा तोल संत सावरी। केल्याचा स्पर्श नसे अंतरी।’ म्हणीत जेथे उणे दिसते तिथे कार्य करताना गावकऱ्यांचा सहभाग लाभत असल्याचे अंबाडकर यांनी सांगितले.
सर्व समाजबांधवांनी एकाच स्मशानभूमित अंत्यविधीसाठी यावे, यासाठी आपण कार्यरत आहे. समाजसेवा करताना अंधश्रद्धा, भीती नष्ट व्हावी, चांगले विचार समाजात रूजवावे यासाठी हे विनामूल्य कार्य आपण करतो.
- रमेश अंबाडकर,
सामाजिक कार्यकर्ते, बोर्डी.