जैविक खतांवर बहरली भाजी, फळांची बाग
By admin | Published: October 29, 2015 12:31 AM2015-10-29T00:31:11+5:302015-10-29T00:31:11+5:30
अलीकडे शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. सुरूवातीला यामुळे उत्पादनात वाढ झाली. मात्र, कालांतराने रासायनिक खतांचे दुष्परिणाम दिसू लागले.
लोणीच्या शेतकऱ्याची यशोगाथा : नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग
त्रिनयन मालपे लोणी
अलीकडे शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. सुरूवातीला यामुळे उत्पादनात वाढ झाली. मात्र, कालांतराने रासायनिक खतांचे दुष्परिणाम दिसू लागले. जमिनी नापीक झाल्यात. शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळेच रासायनिक खतांच्या आहारी न जाता वरूड तालुक्यातील लोणी येथील नीलेश केशवराव आकोटकर या शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा मार्ग अवलंबिला आणि विषमुक्त भाजीपाला व फळे पिकविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्या अर्ध्या एकर शेतीत अद्रकाची लागवड त्यांनी केली. या प्रयोगात खर्च वजा जाता त्यांना एक लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. कृषितज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्याद्वारे लिहिलेली पुस्तके वाचून त्यातून टिप्स घेऊन नीलेश यांनी हा प्रयोग यशस्वी केला.
यंदाच्या हंगामात नीलेश आकोटकर यांनी १०० टक्के नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लोणी ते हिवरखेड मार्गावरील आठ एकर शेतीमध्ये त्यांनी हा प्रयोग केला. त्यासाठी त्यांनी केवळ देशी गार्इंचे गोमूत्र, गायीचे शेण यापासून तयार झालेले जैविक खत वापरले. त्यातून सव्वा एकरात आलं, एका एकरात वांगी, एका एकरात मिरची, दीड एकर शेतीमध्ये केळी आणि उर्वरित जमिनीत संत्राबाग फुलविली. सर्व पिकांना ते गोमूत्र आणि पाणी एकत्र करून ड्रीपद्वारे फवारणी करतात. १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, एक किलो डाळीचे पीठ, एक किलो गूळ आणि शेताच्या बांधावरील मूठभर माती यांचे मिश्रण करून २०० लिटर पाण्यात हे मिश्रम ४८ तास आंबवतात. त्यानंतर हे द्रावण थोडे-थोडे करून झाडाच्या बुंध्याजवळ टाकतात किंवा ड्रीपद्वारे पिकांना देतात.
या जिवामृतामुळे जमिनीला अन्न घटकांचा पुरवठा तर होतोच शिवाय त्यातील डाळीच्या पिठामुळे हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिरावण्यास मदत होते. शेणामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणुंची संख्या वाढून जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. त्यामुळे मुळांना आॅक्सिजन मिळते, असे आकोटकरांचे म्हणणे आहे. किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून त्यांनी शेतात प्रत्येक सरीवर झेंडूची १०० झाडे लावली आहेत. पिकांवर येणारी कीड झेंडूच्या फुलांकडे आकृष्ट होतात. त्यांचा हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग शतप्रतिशत यशस्वी ठरला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे हैराण होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबिणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा.