भामटा शिक्षक भाडेकरू म्हणून आला अन् कार घेऊन पळाला

By admin | Published: February 25, 2017 12:15 AM2017-02-25T00:15:51+5:302017-02-25T00:15:51+5:30

जुळ्या शहरात दररोज नवनवीन घटना घडत असताना ब्राम्हण सभा कॉलनीत राहण्यास आलेला एक तोतया शिक्षक नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यालाच चुना लावून गेला.

Bhamata teacher came as a tenant and ran away with a car | भामटा शिक्षक भाडेकरू म्हणून आला अन् कार घेऊन पळाला

भामटा शिक्षक भाडेकरू म्हणून आला अन् कार घेऊन पळाला

Next

२० हजार नेले नगदी : परिसरातीलच मुलगा दाखविला स्वत:चा
परतवाडा : जुळ्या शहरात दररोज नवनवीन घटना घडत असताना ब्राम्हण सभा कॉलनीत राहण्यास आलेला एक तोतया शिक्षक नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यालाच चुना लावून गेला. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. घर भाड्याने पाहिजे असल्याचे सांगून घरमालकाकडून अगोदर रोख २० हजार रूपये आणि नंतर कार पळवून नेल्याचा संतापजनक मात्र तेवढीच मजेशीर घटना घडली आहे.
रणजित विश्वनाथ गावंडे असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. ते शहरातील गर्भश्रीमंत समजल्या जाणाऱ्या ब्राम्हणसभा कॉलनीत राहतात.
गत आठवड्यात एक इसम त्यांच्या घरी आला. आपण जिल्हा परिषद शिक्षक असून आपणास खोली भाड्याने पाहिजे असल्याचे रणजित गावंडे यांना सांगितले. गावंडे यांनी तीन खोल्यांचा ब्लॉक त्या नवीन भाडेकरूला दाखविला. त्या भामट्या शिक्षकाने तो पसंद केला. लगेच त्याने नवीन पलंग, एक होम थिएटर भाड्याने घेतलेल्या खोलीत आणून ठेवले आणि राहू लागला.
गावंडे यांनी उदार मनाने माणुसकी दाखवित त्या भाडेकरुला जेवण नास्ता करायलासुद्धा बोलाविले. चार-पाच दिवसांत दोघांची चांगली ओळख झाली. सकाळी दोघे मॉर्निंग वॉकला जाऊ लागले. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने अशी हातचलाखी केल्याची चर्चा परिसरात आहे.

२० हजार रुपये नगदी
शिक्षक असल्याने जवळचे गाव मिळावे यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना वीस हजार रुपये द्यायचे आहे म्हणून रणजित गावंडे यांना उसनवारीवर मागितले. पत्नी येताच परत देण्याची बतावणी केली. घरमालक गावंडेंनी अडचण पाहता शहरातील एका ज्वेलर्समधून स्वत: उसने घेऊन त्या तोतया शिक्षकाला दिले.

कार घेऊन पळाला
२० हजार रुपये रोख घेतल्यावर आपण पत्नीला आणायला बडनेराकडे जात असल्याचे या भाडेकरू शिक्षकाने घरमालक रणजित गावंडे यांना सांगितले. गावंडेला अमरावतीला जायचे असल्याने दोघेही अमरावतीला २० फेब्रुवारीला गेले. तेथून बडनेरा रेल्वे स्टेशनवर आले. मात्र गाडीला दोन तास उशीर असल्याचे त्याने सांगितले. वेळ असल्याने दोघेही गावंडे यांच्या किशोरनगर येथील नातेवाईकांकडे आले. तेथे गावंडे आणि त्या शिक्षक पती-पत्नीसाठी स्वयंपाक बनविण्यात आला. तेवढ्यात आपण पत्नीला घेऊन येतो म्हणून गावंडे यांच्या कार क्रमांक एम. एच. २७ व्ही-६५४८ ची चावी मागितली आणि पत्नीला आणायला गेला. रात्र झाली तरी अजूनपर्यंत परतलाच नाही. त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला, मात्र संपर्क झाला नाही.

पोलिसात गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकरणाची फिर्याद रणजीत गावंडे यांनी अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास चालविला आहे.

मुलगा पण परिसरातील
रणजित गावंडे यांच्या घरी आलेल्या तोतया शिक्षकाने भाड्याने घर पाहण्यासाठी ब्राम्हणसभा कॉलनीतीलच एका लहान मुलास नेऊन स्वत:चा मुलगा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुळातच तो फसवणूक करण्यासाठी आल्याचे सिद्ध झाले आहे. या घटनेची परिसरात खमंग चर्चा सुरू आहे.

Web Title: Bhamata teacher came as a tenant and ran away with a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.