जिल्हा कचेरीवर उधळला भंडारा, धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार
By उज्वल भालेकर | Published: September 26, 2023 07:48 PM2023-09-26T19:48:46+5:302023-09-26T19:50:01+5:30
सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात.
उज्वल भालेकर, अमरावती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच मागणीसाठी चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी परिसरात भंडारा उधळण्यात आला; तसेच कपाळावर भंडारा लावून धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले.
धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याामुळे ७६ वर्षांपासून धनगर बांधवांना आपल्या हक्कावर पाणी सोडावे लागल्याचे धनगर शिष्टमंडळाने म्हणने आहे. धनगर बांधवांनी अनेकवेळा निवेदन व आंदोलने करूनही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. २०१४ च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ते सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेट बठकीमध्ये धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळेच धनगर समाजाने त्यांना मतदान केेले; परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर एकदाही धनगर आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मांडला नसल्याचे धनगर समाजाचे म्हणने आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न आता चिघळला आहे. राज्य व केंद्र सरकारने धनगरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी धनगर समाजाला आरक्षण घोषित करा, अन्यथा लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
आरक्षणाची लढाई ही स्वतंत्र धनगर समाजाची आहे. समित्या व बैठकांच्या भूलथापांना आता धनगर समाज भीक घालणार नाही, असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी ॲड. दिलीप एडतकर, ॲड. अचल कोल्हे, विनय पुनसे, अरुण बांबल, भास्कर ढेवले, प्रदीप अलोने, शंकर ढवले, उमेश घुरडे, नंदा चापले, प्रा.राजश्री टेकाडे, प्रतिभा उमेकर, विनिता गादे, शारदा ढवळे, मेघा बोबडे, वंदना गायनर, छबू मातकर, प्रेमा लव्हाळे, कैलास निंघोट, ज्ञानेश्वर ढोमने, अशोक इसळ, जानराव घटारे, रामकृष्ण गावनर, भास्कर पुनसे, अंबादास चारथळ, डॉ. बाबूराव नवले, मनोहर पुनसे, अशोक लव्हाळे आदी समाजबांधव सहभागी झाले होते.