राहत्या घरी घेतली २० हजारांची लाच; भातकुलीच्या लाचखोर मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By प्रदीप भाकरे | Published: November 11, 2022 04:25 PM2022-11-11T16:25:20+5:302022-11-11T16:37:47+5:30
खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा
अमरावती : शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भातकुली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. करिष्मा सतीशराव वैद्य (२७) असे लाचखोर मुख्याधिकाऱ्याचे नाव आहे. त्या दोन वर्षांपासून भातकुली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू महालक्ष्मी नगर येथील भाड्याच्या घरात त्यांनी लाचेची रक्कम स्विकारली.
भातकुली येथील दुकानांमध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी वैद्य या ५० हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार भातकुली येथील एका महिलेने ३० ऑक्टोबर रोजी एसीबीकडे नोंदविली. २ नोव्हेंबर रोजी पडताळणीदरम्यान वैद्य यांनी ५० हजार रुपयांपैकी २० हजार स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजीच्या सापळयादरम्यान, वैद्य यांनी घरी पैसे घेऊन येण्यास सांगितले. वैद्य यांनी शुक्रवारी २० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. खोलापूरी गेट पोलीस ठाण्यात वैद्यविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्य या मुख्याधिकारी ब संवर्गाच्या अधिकारी आहेत.
टीम एसीबीची कारवाई
अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षकद्वय अरुण सावंत व देविदास घेवारे, उपअधीक्षकद्वय संजय महाजन व शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षकद्वय प्रविण पाटील व केतन मांजरे यांच्यासह साबळे, राहुल वंजारी, विनोद कुंजाम, युवराज राठोड यांनी हा ट्रॅप यशस्वी केला. वैद्य यांच्या लाचखोरीबाबत नगरविकास विभागाला कळविण्यात येणार आहे.