भातकुली, नांदगाव, तिवसा, मोर्शी, वरूड ‘डेंजर झोन’मध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:29 AM2019-07-27T01:29:47+5:302019-07-27T01:30:26+5:30

यंदाच्या पावसाळ्यात ढगांऐवजी जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे मळभ दाटून आले आहेत. अत्यल्प पर्जन्यमानाने जिल्ह्यात सर्वदूर खरिपाची पहिली पेरणी उलटली. पावसाच्या दीर्घ विश्रांतीने भातकुली, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी आणि वरूड हे पाच तालुके डेंजर झोनमध्ये आले आहेत.

Bhatkuli, Nandgaon, Tivasa, Morsi, Wood in 'Danger Zone'! | भातकुली, नांदगाव, तिवसा, मोर्शी, वरूड ‘डेंजर झोन’मध्ये!

भातकुली, नांदगाव, तिवसा, मोर्शी, वरूड ‘डेंजर झोन’मध्ये!

Next
ठळक मुद्देपरिस्थिती चिंताजनक : सोयाबीनवर ‘ट्रॅक्टर’, कपाशीने टाकल्या माना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात ढगांऐवजी जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे मळभ दाटून आले आहेत. अत्यल्प पर्जन्यमानाने जिल्ह्यात सर्वदूर खरिपाची पहिली पेरणी उलटली. पावसाच्या दीर्घ विश्रांतीने भातकुली, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी आणि वरूड हे पाच तालुके डेंजर झोनमध्ये आले आहेत. दोन दिवसांपासून पाऊस परतला असला तरी पूर्वीच्या दडीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला. १९७२ साली पडलेल्या दुष्काळापेक्षाही यंदाचे अस्मानी संकट तीव्र असल्याच्या शेतकऱ्यांकडून भावना व्यक्त होत आहेत.
जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक पावसाच्या हुलकावणीने जळाले. कपाशीचे बीजांकुर वाळले. मूग, उडीद तर केव्हाचेच बाद झाले. एकंदर सरासरीच्या निम्म्या पावसाने यंदाचा खरीप हंगाम कोलमडला आहे. जिल्ह्यातील १९०० गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचीच परिस्थिती आहे. यंदा प्रखर उन्हाने उन्हाळ्यातच दुष्काळाची चाहूल लागली होती. जुलैच्या तिसºया आठवड्यात तिचे वास्तव स्वरूप प्रकट झाले. लाखो रुपये खर्च करून केलेली पेरणी साधली नसल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरविला जात आहे. तुरीचे कोंबही वाळले आहेत. आता केवळ कपाशीवर शेतकºयांची मदार आहे. जुलैच्या तिसºया आठवड्यात पिण्याला अन् सिंचनालाही पाणी नाही. तलावातही नाही अन् धरणातही नाही. यावरून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात येते. मागील आठवड्यात पावसाची प्रतीक्षा करून थकलेल्या अनेक शेतकºयांनी सोयाबीन व कपाशीवर ट्रॅक्टर, नांगर फिरवून शेत दुबार पेरणीसाठी तयार केले. सलग चौथ्या वर्षी शेतकरी अस्मानी संकटाला सामोरे जात आहेत.
अप्पर वर्धा : ११.१६ टक्के जलसाठा
अमरावती जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेल्या सर्वात मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पात २६ जुलैअखेर केवळ ६२.९४ दशलक्ष घनमीटर इतका नीचांकी जलसाठा आहे. ती टक्केवारी ११.१६ अशी आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीही पर्जन्यमान कमी झाले होते. असे असतानाही अप्पर वर्धात ४४.९७ टक्के जलसाठा होता. यावरून यंदाच्या भीषणतेची कल्पना यावी.
२४ तासांत ११.८ मिमी पाऊस
मागील २४ तासांत जिल्ह्यात केवळ ११.८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात अमरावती ६.४ मिमी, नांदगाव खंडेश्वर ५, चांदूर रेल्वे १३.९, धामणगाव रेल्वे १५.९, तिवसा ४.५, वरूड ८.१, धारणी १६, चिखलदारा ४४.८, भातकुली ५, मोर्शी ५.३, अचलपुरात १९.४, चांदूरबाजार तालुक्यात ११.६, दर्यापूर तालुक्यात २.८, तर अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६.३ मिमी पावसाची नोंद झाली.
सहा तालुके अद्यापही पन्नाशीच्या आत
मान्सूनचे ५६ दिवस उलटले असताना सहा तालुक्यांनी अद्यापही पावसाच्या सरासरीतल पन्नशीही ओलांडलेली नाही. १ जून ते २६ जुलै या कालावधीत अपेक्षित पावसाच्या तुलनेत भातकुली तालुक्यात ३५.९ टक्के, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४३.६ टक्के, तिवसा तालुक्यात ४१.३ टक्के, मोर्शी ४१ टक्के व वरुड तालुक्यात सरासरीच्या केवळ ३२.८ अशा नीचांकी पावसाची नोंद झाली. याशिवाय दर्यापूर तालुक्यात आतापर्यंत ४९.७ टक्के पाऊस पडला.
धारणीही माघारले
जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरासरीने शंभरी गाठली तरी पावसाने ओढ दिल्याने धारणी तालुक्यात आता सरासरी ७१.३ टक्के इतकी खाली आली आहे. धारणीत मुसळधार पावसाने खरिपाची पेरणी लांबली होती. मात्र, आता पंधरा दिवसापासून पाऊस न आल्याने तेथील शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

विभागात आतापर्यंत ९३ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. १ जून ते २६ जुलैपर्यंत विभागात २०५.१ मिमी पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात ८९ टक्के पेरणी झाली असून, कुठेही दुबार पेरणीची नोंद नाही.
- सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक

Web Title: Bhatkuli, Nandgaon, Tivasa, Morsi, Wood in 'Danger Zone'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती