भातकुलीचे कोविड केअर सेंटर अमरावतीत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:13 AM2021-03-05T04:13:03+5:302021-03-05T04:13:03+5:30
आरोग्य विभागाचा असाही प्रताप : गृह विलगीकरण नावापुरतेच, भातकुली शहरात पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ किशोर लेंडे भातकुली : गतवर्षी येथील ...
आरोग्य विभागाचा असाही प्रताप : गृह विलगीकरण नावापुरतेच, भातकुली शहरात पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ
किशोर लेंडे
भातकुली : गतवर्षी येथील तंत्रनिकेतन विद्यालयात सुरू असलेले कोविड केअर सेंटर बंद करून ती व्यवस्था भातकुलीऐवजी अमरावती शहरात करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधितांची नावे सामान्य जनतेला माहिती नसल्याने गृह विलगीकरण नावापुरतेच झाले आहे. परिणामी भातकुली शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भातकुली शहरासह तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांसाठी येथील गणोजा देवी मार्गावरील तंत्रनिकेतन विद्यालयात गतवर्षी शेल्टर होम सुरू करण्यात आले होते. या शेल्टर होममध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना विश्रांती व औषोधोपचार करण्यात येत असे. त्यामुळे भातकुली शहरासह तालुक्यातील रुग्णांची मोठी सोय झाली होती. विशेष म्हणजे भातकुली, आसरा, गणोरी, दाढी, खोलापूर, वाठोडा शुक्लेश्वर, चेचरवाडी, धामोरी परिसरातील अनेक गावांना हे शेल्टर होम अत्यंत सोयीचे होते. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी सोय झाली होती. मात्र, यावर्षी कोविड केअर सेंटर भातकुली येथे न होता अमरावती येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात स्थापन केल्याने भातकुली शहरासह तालुक्यातील विविध गावातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे.
'त्या' गावासाठी हलविले शेल्टर होम
भातकुली तालुक्यातील परतवाडा व चांदूरबाजार मार्गावरील आष्टी, रामा, साऊर, टाकरखेडा, पूर्णानगर गावातील लोकांना भातकुलीचे अंतर अधिक असल्याने कोविड केअर सेंटर अमरावतीत स्थापण्यात आल्याचे सांगण्यात येते. वास्तविक पाहता भातकुली परिसरातील खोलापूर, वाठोडा शुक्लेश्वर आदी भागातील ८० टक्के नागरिकांना भातकुली येथेच सोयीचे होणार आहे. तरीही बोटावर मोजण्याइतक्या गावांसाठी हे कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आल्याने तालुक्यातील नागरिकांत कमालीची नाराजी पसरली आहे.
----------------------
- तर त्यांना वलगाव येथे भर्ती करा
तालुक्यातील आष्टी, रामा, साऊर, टाकरखेडा, पूर्णानगर आदी गावांतील लोकांना भातकुलीचे अंतर अधिक वाटत असेल तर त्यांना त्यांच्या सोईने वलगाव किंवा अमरावती येथील कोविड केअर सेंटरला भर्ती करा. मात्र, भातकुली येथील शेल्टर होम पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
------------------------------
भातकुलीत सर्व सुविधा असताना स्थानांतर का?
भातकुली हे तालुक्याचे ठिकाण असून येथे नगरपंचायत, ग्रामिण रुग्णालय आहे. १०८ रुग्णवाहिका आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाणे आहे. अमरावती जाण्यासाठी सुसज्ज राज्य मार्ग असून या मार्गाचे रुंदीकरण झाल्याने वाहतुकीची मोठी सोय झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयापासून अंतर कमी आहे. ह्या सर्व सुविधा असतांना कोविड केअर सेंटर अमरावतीत का स्थापन करण्यात आले. असा प्रश्न भातकुली शहरवासी विचारत आहे.
----------------------------
खासदार, आमदारांनी दखल घेण्याची गरज
भातकुली येथे मागील वर्षी सुरू असलेले शेल्टर होम यावर्षी अमरावतीत सुरू केल्याने भातकुली शहरासह तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. शहरात रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने भातकुली येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी खासदार व आमदारांनी दखल घेण्याची गरज असल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे.
फोटो कॅप्शन : अमरावतीत मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात स्थापन केलेले हेच ते कोविड केअर सेंटर