वृद्धाश्रमात साजरी केली भाऊबीज
By admin | Published: November 14, 2015 12:16 AM2015-11-14T00:16:23+5:302015-11-14T00:16:23+5:30
ज्यांची मुले सुखवस्तू कुटुंबातील आहेत, उच्चपदस्थ आहेत. परंतु त्यांना वृद्ध आई-वडील नकोसे वाटतात अशा वृद्धांसमवेत गुरुकुंजातील संजय देशमुख व मित्र परिवाराने...
सामाजिक दायित्वाचा परिचय : वृद्धांना गोडधोड जेवण, कपड्यांचे वाटप
तिवसा : ज्यांची मुले सुखवस्तू कुटुंबातील आहेत, उच्चपदस्थ आहेत. परंतु त्यांना वृद्ध आई-वडील नकोसे वाटतात अशा वृद्धांसमवेत गुरुकुंजातील संजय देशमुख व मित्र परिवाराने शुक्रवारी भाऊबीज साजरी करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला आहे.
राष्ट्रसंतांची कर्मभूमी असलेल्या गुरुदेव वृद्धाश्रमात अनेक वर्षांपासून देशमुख आणि मित्र परिवारातर्फे भाऊबीजेच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येतो. या दिवशी सकाळी वृद्धांना अंभग्यस्रान घालावे, त्यांची वाढलेली नख काढून देणे, त्यांची दाढी, कटिंग करणे, त्यांना नवीन कपडे देणे व या सर्व वृद्धांना गोडधोड पदार्थांचे जेवण देणे हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. यांच्याशी जीवनात दिवाळीचा प्रकाश यावा, त्यांना घरची आठवण येऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. राष्ट्रसंतांनी घालून दिलेल्या शिकवणीवर आधारित सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य या वृद्धाश्रमात होत आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख यांच्यांसमवेत तिवसा पंचायत समितीच्या उपसभापती गौरी देशमुख, नीलेश राऊत, हेमंत तायडे, सुरेंद्र भिवगडे, राज माहोरे, नरेंद्र काकडे, सदानंद आखरे, संदीप राघोर्ते, आशिष लांजेवार, प्रेमानंद कांडलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)